छत्रपती संभाजीनगर : चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर वा संत एकनाथ यांच्या विरोधात षडयंत्र, टिंगल हे आपण ग्रंथात, कथेत वाचले वा ऐकले असेल; पण या महान संतांच्या विरोधात कटकारस्थाने जिथे रचली गेली, तो दक्षिण काशी ‘पैठण’मधील ‘कुच्चर ओटा’ आजही त्या घटनांची साक्ष देत उभा आहे.
गावागावात, गल्लीबोळात ‘कुच्चर ओटे’ असतात; पण कुच्चर ओटा संस्कृतीत आद्य मान द्यायचा झाल्यास तो पैठणच्या मामा चौकातील कुच्चर ओट्याला द्यावा लागेल. याच ओट्यावरच्या कुटाळकीतून सातवाहन काळात ‘गाथासप्तशती’सारखे भव्य काव्य निर्माण झाले. अनेक पैजा लावल्या गेल्या, चढाओढीतून नवीन इतिहास घडला; पण नंतर ओट्याने आपले रंग बदलले ते चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर यांच्या काळात. ज्ञानदेव भावंडांना ‘संन्याशाची पोरे’ म्हणून हिणवले तेही याच कुच्चर ओट्यावर बसलेल्या लोकांनी. त्या काळात मनोरंजनाची साधने नव्हती, दैनंदिन कामे आटोपून लोक ओट्यावर बसत व कुचाळक्या करीत.
ज्ञानदेवांवरच्या शुद्धिपत्रांसंबंधात याच कुच्चर ओट्यावर चर्चा होऊन धर्मसभेत आरोप ठेवण्यात आले. या कुटाळक्या करणाऱ्या लोकांनी शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनाही सोडले नाही. मात्र, हे संत या सर्वांना पुरून उरले. कटकारस्थान करणारे नंतर त्यांना शरण गेले. असा हा ऐतिहासिक कुच्चर ओटा नगर परिषदेने जपून ठेवला आहे. त्यावर लोखंडी जाळी लावल्या आहेत.
सोशल मीडियाने आता कुच्चर ओटे बनले जागतिकयाच ओट्यावरून कित्येक चळवळींची सुरुवातही झालेली आहे. सामाजिक परिवर्तनाचे हे एक केंद्र होते. ही सुद्धा या कुच्चर ओट्याची दुसरी बाजू होय. काळानुरूप बदल म्हणजे सोशल मीडियामुळे कुच्चर ओटे जागतिक बनले आहेत. त्यांची जागा फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ट्विटरने घेतली आहे.-जयवंत पाटील, पैठणचे ऐतिहासिक स्थळ अभ्यासक
नागदेवतेचे वास्तव्यकुच्चर ओट्यावर दगडी देवळी आहे. त्यावर सुरेख नक्षीकाम असून त्यात नागदेवता विराजमान आहे. सातवाहन काळाच्या आधी पैठणमध्ये नागवंशी लोकांची वसाहत होती. त्यांचे नाग हे दैवत होते. यामुळे त्यांनी ओट्यावर पूजेसाठी अनंत नागदेवतेची देवळी तयार केली, असे अभ्यासकांनी नमूद केले.