छत्रपती संभाजीनगर: शहरातील जेष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. रफत कुरेशी यांचे ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने कॅनडा येथे निधन झाले. ते काही काळापासून कॅनडा येथे वास्तव्यास होते. छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासाबद्दल जाण आणि आपुलकी असलेले अभ्यासक डॉ. कुरेशी हे इतिहासाचे विद्यार्थी आणि शहरातील नागरिकांत प्रसिद्ध होते. त्यांनी शहराच्या इतिहासावर प्रामुख्याने उर्दू भाषेत विपुल लेखन केले आहे. तसेच शहरातील अनेक ऐतिहासिक स्मारके संरक्षित होण्यात त्यांच्या विशेष प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. इतिहास अभ्यासक पत्नी डॉ. दुलारी कुरेशी यांच्यासोबत सुरू केलेल्या शहरातील इतिहासाला उजाळा देणारा हेरिटेज वॉक आजही विद्यार्थी, नागरिकांच्या मनात घर करून आहे. छत्रपती संभाजीनगरचा आत्मा जाणणाऱ्या जेष्ठ इतिहास अभ्यासकाच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. रफत कुरेशी यांनी छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासावर सखोल संशोधन केले. त्यांच्या "औरंगाबाद-नामा" या पुस्तकात शहरातील ऐतिहासिक स्थळांची विस्तृत माहिती आहे. ज्यामध्ये प्राचीन लेण्या, मंदिरे, देवगिरी किल्ला, आणि ऐतिहासिक वास्तूंचा समावेश आहे. हे पुस्तक २०१६ साली उर्दूत प्रसिद्ध झाले आणि नंतर डॉ. दुलारी कुरेशी यांनी मराठीत अनुवादित केले. त्यांच्यामुळे शहराच्या इतिहासाची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे. त्यांनी अनेक वारसा वास्तू जतन केल्या आणि त्यांचे जतन करण्यासाठी अथक संघर्ष केला. त्यांच्या निधनामुळे इतिहासप्रेमी आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
उर्दूत विपुल लेखन करणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेखकडॉ. रफत कुरेशी यांचे नाव इतिहास व गद्यवाङ्मयाचे लेखक म्हणून विख्यात आहे. अतिशय लहान वयात त्यांनी लेखनाची सुरुवात केली आणि त्यांचा लेखनाचा हा प्रवास पन्नासहून जास्त वर्षांपासून चालूच आहे. कुरेशी यांचा कला व संस्कृतीवरचा गाढा अभ्यास आहे व पत्रकार म्हणून पण त्यांनी 'आर्ट अॅण्ड ग्लॅमर' नावाचे नियतकालिक चार वर्षे यशस्वीरीत्या चालवले. त्यांचे अनेक लेख नामांकित वृत्तपत्रांमध्ये छापले गेले. अमेरिकेमधील शिकागो उर्दू टाइम्समध्ये त्यांचा अजिंठावर लेख छापला गेला. जेस रस्सव व रोनाल्ड कोहन नावाचे जागतिक स्तराच्या लेखकांनी रफत कुरेशी यांच्या कामावर एक पुस्तक छापले जे ऑनलाईन उपलब्ध आहे.
शहराच्या इतिहासावर विपुल लेखन कुरेशी यांचे घराणे गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षांपासून शहरात आहे. त्यामुळे शहराची जुनी माहिती कुरेशी यांनी बालपणापासून गोळा केली होती. औरंगाबादनामा हे पुस्तक लिहिताना एएसआय हैदराबादच्या सालारजंग म्युझियममधील ग्रंथांची मदत झाली. तब्बल दोन वर्षांच्या प्रयत्नांनतर औरंगाबादनामा हे पुस्तक तयार झाले. छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहरावर अनेक पुस्तके लिहिणारे आणि उर्दू वृत्तपत्रांमध्ये योगदान देणारे ते एक लेखक होते. दिल्लीहून प्रकाशित झालेले त्यांचे पहिले पुस्तक "मुल्क-ए-खुदा तंगनीस्त" हे प्रवासवर्णन आहे. या पुस्तकात औरंगाबाद, अजंता, इल्लोरा येथील जागतिक वारसा स्थळे तसेच औरंगजेबने बांधलेली क्विले-ए-आर्क सारखी स्थानिक ऐतिहासिक स्थळे आणि राजवाड्यातील रंजक घटनांचे वर्णन केले आहे. तथापि, "तजकिरे उजळो के" नावाचे त्यांचे अलीकडील पुस्तक हे व्यक्तिमत्त्व, भाषांतरे, पुनरावलोकने, इतिहास आणि विनोद, तसेच उर्दू साहित्यातील काही नामांकित नावांच्या त्यांच्या कार्यावरील पुनरावलोकने यावरील भिन्न प्रकरणे समाविष्ट करणारे पुस्तक आहे.