वाळूमाफिया झाले मुजोर: आता पोलीस पाटलाच्या ताब्यातील हायवा लांबविलावाळूज महानगर: वाळूज पोलीस ठाण्यातून गायब झालेल्या ‘हायवा’चा अद्यापपर्यंत शोध लागलेला नसतानाच गुरुवारी शेंदूरवादा परिसरातून पोलीस पाटलाच्या ताब्यातील हायवा वाळूमाफियाने पळविल्याचे उघडकीस येत आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
वाळूज परिसरात लांझी, धामोरी, टेंभापुरी, पिंपरखेडा, शिवपुर, शेंदूरवादा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू साठे आहेत. औरंगाबाद,वाळूज एमआयडीसी व डीएमआयसीत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्याने वाळूची मागणी वाढली आहे. त्यातच बहुतांश वाळू साठ्यांचे लिलाव झालेले नसल्याने वाळूमाफिया वाळूचे अवैध उत्खनन करुन विक्री करीत आहेत. हायवा, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर आदी वाहनांतून वाळूची तस्करी केली जात आहे. वाळू चोरीला आवर घालण्यासाठी महसूल विभागाने मोहीम हाती घेतली असून, पंधरा दिवसांपूर्वी पथकाने छापे मारुन २३ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले होते.
गंगापूरचे तहसीलदार डॉ.अरुण जºहाड, तलाठी अशोक कळसकर आदींच्या पथकाने वाळूज परिसरात अनधिकृतपणे सुरु असलेल्या वाळू पट्ट्यांत छापे मारले होते. यावेळी पथकाने वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा (एम.एच.२०, ई.जी.६७१८) पकडून वाळूज पोलीसांच्या स्वाधीन केला होता. तो वाळूज पोलीस ठाण्यासमोरुन गायब झाल्याने पोलीस प्रशासनाची नाचक्की झाली होती. या प्रकरणी लोकमतनेही वृत्त प्रकाशित केल्यामुळे बुधवारी हायवा मालक दीपक वाठमोडे व चालक ईक्बाल शेख या दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
या हायवाचा शोध लागलेला नसतानाच शेंदूरवादा परिसरातून पुन्हा एक हायवा वाळूमाफियांनी पळविल्याचे उघडकीस आले आहे. महसूलचे एस.एल.राठोड, पोलीस पाटील जयराम दुबिले, कोतवाल अनिल फाजगे आदींच्या पथकाने १३ नोव्हेंबरला शेंदूरवादा येथे वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा (एम.एच.२०-सी.टी.९८८९) पकडला होता. तो पोलीस पाटील जयराम दुबिले यांच्या ताब्यात देण्यात आला होता. याच दिवशी रात्री वाळूमाफियांनी तो पळवून नेला. ही बाब दुसऱ्या दिवशी लक्षात येताच दुबिले यांनी तहसीलदार डॉ.जºहाड यांना माहिती दिली. या हायवा चोरीप्रकरणी मालक अजय लक्ष्मण चौधरी (रा.औरंगाबाद) व चालक अनिल रुस्तुम मनोरे या दोघांविरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याचे फौजदार अमित बागुल यांनी सांगितले.