छत्रपती संभाजीनगर : बुलेट वा अन्य स्पोर्ट्स बाइकच्या सायलेन्सरमध्ये बदल करून इतरांना कर्कश आवाजाचा मनस्ताप देणाऱ्या ५३ ‘बुलेट राजां’वर हातातले काम सोडून रस्त्यावर सायलेन्सर बदलण्याची वेळ आली.
फा$ट फा$ट असा आवाज करत जाणाऱ्या दुचाकी चालकांचा सध्या सुळसुळाट आहे. मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून रस्त्यांवरून सुसाट गाडी दामटणाऱ्यांना इतरांना होणाऱ्या त्रासाची जाणीवदेखील होत नाही. त्याशिवाय याच सायलेन्सरमधून फटाक्यांप्रमाणे चित्रविचित्र आवाज वाजवत दुचाकी चालक पळत सुटतात. यापूर्वी या विरोधात वाहतूक पोलिसांनी मोहीम उघडली. मात्र, त्यात सातत्य राहिले नाही. आता पुन्हा वाहतूक पोलिसांना या आवाजाचा त्रास जाणवल्याने वाहतुकीच्या पाचही विभागांकडून सात दिवस विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले.
-सात दिवस सकाळी ९:३० ते सायंकाळी ४ ते ८ या वेळेत प्रमुख मार्गांवर कारवाई होईल.-पहिल्या दिवशी ११५ दुचाकी चालकांना १ लाख़ १५ हजारांचा दंड. ४२ हजारांचा दंड वसूल.-५३ बुलेट व अन्य स्पोर्ट्स बाइकस्वारांना जागेवर कंपनीचे मूळ सायलेन्सर बदलण्यास भाग पाडून नंतर दुचाकी सोडण्यात आली.-सायलेन्सर बदलण्यास नकार देणाऱ्या ५ जणांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या.
सहायक आयुक्त धनंजय पाटील यांना थेट प्रश्नप्रश्न : यापूर्वी कारवाई झाली. मात्र सातत्य राहिले नाही.उत्तर : आता खंड पडणार नाही. कर्कश आवाज करत जाणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.
प्रश्न : सायलेन्सरच्या बनावटीवरून वाद आहेत ?उत्तर : बुलेट किंवा कंपनीचे मूळ सायलेन्सर असल्यास कारवाई नाही. केवळ ‘मॉडिफाइड’ सायलेन्सवर कारवाई होईल.
प्रश्न : सायलेन्सर बदलण्यास असमर्थता दर्शवल्यास काय ?उत्तर : पोलिसांना दुचाकी जप्तीचे अधिकार आहेत. वाहनात बदल केल्यास गुन्ह्याची तरतूद आहे. सर्वसामान्यांना त्रास होत असल्याने कठोर भूमिका घेत आहोत.