बीड : जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभाराचा पंचनामा करण्यासाठी बुधवारी विभागीय कार्यालयातील दोन सदस्यीय समिती येथे दाखल झाली़ समितीने झाडाझडती सुरु केली असून शिक्षण विभागापासून चौकशीचा श्रीगणेशा केला आहे़ पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण फाईल्स ताब्यात घेतल्या़ चौकशीचा ससेमिरा सुरु झाल्याने घोटाळेबाजांच्या झोपा उडाल्या आहेत़अपर आयुक्त जितेंद्र पापळकर, उपायुक्त अस्थापना विवेक गुजर यांचा समितीत सहभाग आहे़ तेरावा वित्त आयोग, झेडपीआर, नियमबाह्य पदोन्नत्या, शिक्षकांच्या बदल्या यानुषंगाने कास्ट्राईब कर्मचारी संघटनेसह काही राजकीय पक्षांनी तक्रारी केल्या होत्या़ शिवाय चौकशीच्या मागणीसाठी आंदोलने, उपोषणे देखील झाली होती़ त्यानंतर आयुक्त संजीव जैस्वाल यांनी चौकशी समिती नेमून अहवाल मागविला होता़ पापळकर, गुजर यांनी बीडमध्ये आल्यावर सर्वात आधी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली़ त्यानंतर सीईओ राजीव जवळेकर यांची भेट घेऊन समितीने प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात केली़ प्राथमिक विभागात समिती दुपारी साडेबारा वाजता धडकली़ प्रभारी शिक्षणाधिकारी व्ही़ डी़ कुलकर्णी हजर नव्हते़ दालनात बसून बदल्या, पदोन्नत्या, वस्तीशाळा शिक्षकांच्या नियुक्त्यांच्या फाईल्स मागविल्या़ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्यापुढे फाईल्स ठेवल्या़ समिती इतर विभागांतही धडकणार आहे़ त्यामुळे घोटाळ्यात अडकलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे़ (प्रतिनिधी)सीईओ राजीव जवळेकर म्हणाले की, समिती आली आहे, चौकशी सुरु आहे़४वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने तक्रारी होत्या़ त्यामुळे समिती चौकशी करत आहे़ ४काम करताना काही चुका होतात, त्यात सुधारणा केलेली आहे़ ४अतिरिक्त प्रशासकीय मान्यतेची कामे मी रद्द केलेली आहेत़ ४शिक्षण विभागात देखील सुधारणा केल्या आहेत़ ४खूप काही अनियमितता झाली आहे असे नाही़ ४समितीला योग्य ते सहकार्य केले जाईल़४समितीने मागविलेले दस्ताऐवज त्यांना दिले जात आहेत़ काहीही लपवून ठेवले जाणार नाही़दोन स्वतंत्र समित्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेतील घोटाळे, बदल्या, पदोन्नत्यांतील अनियमिततेची चौकशी केलेली आहे़ मात्र, त्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही़ समितीचा अहवाल धूळ खात आहे़अपर आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणाले, आम्ही आता कोठे चौकशी सुरु केली आहे़ अनियमितता काय आहे? चौकशीनंतरच स्पष्ट होईल़ आम्ही आयुक्तांना लवकरच अहवाल देणार आहोत़
समितीने घेतल्या फाईल्स ताब्यात
By admin | Published: September 25, 2014 12:21 AM