खुलताबाद : भेंडाफँक्टरी येथून काविळीचे औषध घेवून वेरूळला परतत असलेल्या मायलेकाच्या दुचाकीस भरधाव कारने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3 वाजता घडली.
याबाबत माहिती अशी की, वेरूळ येथील मातंगवाडा परिसरात राहणारे यमुनाबाई कारभारी कांबळे (51) त्यांचा मुलगा बाळु कारभारी कांबळे( 29) हे मंगळवारी सकाळी दुचाकीवरून ( क्रमांक एम.एच. 20 एफ.एफ.5107 ) नेवासा तालुक्यातील भेंडा फँक्टरी येथेे काविळीचे औषध घेण्यासाठी गेले होते .औषध घेवून परत येत असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कसाबखेडा गावानजीक समोरून येणाऱ्या भरधाव कारने ( एम.एच.26 बी.सी.0195 ) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. कारने दुचाकीसह त्यावरील मायलेकास दूरवर फरफटत नेले. यात यमुनाबाई व बाळू यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर कार चालक फरार झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच वेरूळचे पोलीस पाटील रमेश ढिवरे व कसाबखेडा येथील पोलीस पाटील संतोष सातदिवे यांनी खुलताबाद पोलीसांना कळवले. घटनास्थळी खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे , बीट जमादार वाल्मीक कांबळे , हनुमंत सातदिवे यांनी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्याचे काम सुरू आहे. अपघातस्थळापासून वेरूळ गाव अवघे तीन कि.मी. अंतरावर आहे. घर हाकेच्या अंतरावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.