औरंगाबाद: खाजगी रुग्णालयात नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचे घर शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री जयभवानीनगरात घडली. याघटनेत एक लाखाचे दागिने, एक लाखाची रोकड आणि संसारोपयोगी साहित्य असा सुमारे तीन लाखाचा ऐवज जळून खाक झाला.
प्राप्त माहिती अशी की, जयभवानीनगर येथील गल्ली नंबर १५ मध्ये शंकर तिर्थे मुलगा,सून आणि नातवंडासह राहतात. त्यांच्याच घरातील एका खोलीत त्यांची विवाहित मुलगी ज्योती मुंजाजी कराळे या दहा वर्षाचा मुलगा शिवराजसह राहते. ज्योती एका खाजगी रुग्णालयात नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. मंगळवारी रात्री त्या कामावर होत्या, तर त्यांचा मुलगा शिवराज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरात टि.व्ही.पहात होता. त्यावेळी अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने घरातील साहित्याने पेट घेतला. त्यामुळे शिवराज हा घरातून पळतच बाहेर आला. यावेळी शेजारच्या खोलीत बसलेले त्यांचे आई-वडिल आणि नातेवाईकांनी आग विझविण्यासाठी घरात पाणी मारले, मात्र आग नियंत्रणात येईना. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.