नागरिकांची मुख तपासणी
खुलताबाद : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त, तालुक्यातील कनकशीळ आरोग्य उपकेंद्राच्यावतीने गावातील नागरिकांची मुख तपासणी शिबिर घेण्यात आले. कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करणे, धूम्रपान टाळणे, दारूचे सेवन न करणे, आदी विषयांवर समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रमेश शेळके यांनी मार्गदर्शन केले.
तंबाखू, गुटखा, दारू आदी व्यसनांच्या आहारी तरुण पिढी गेली आहे. त्यामुळे कर्करोग, हृदयविकार, दमा, अस्थमा, ब्रेन स्ट्रोक या भयावह आजारांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून अलिप्त राहिले पाहिजे, असे आवाहन डॉ. शेळके यांनी केले.
यावेळी गावातील नागरिकांची मुख तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वितेसाठी डॉ. निलोफर अंजुम, डॉ. माध्यमसिंग मेहर, डॉ. रमेश शेळके, डॉ. वैभव बाविस्कर, डॉ कुणाल राऊत, डॉ. विशाल ढेपे, डॉ. शगुफ्ता फरहीन, आरोग्यसेविका मीरा त्रिभुवन, आशा दांडगे यांची उपस्थिती होती.