औरंगाबाद : होम आयसोलेशनची (गृहअलगीकरण) सेवा ५ हजार रुपयांत मिळणार आहे. रुग्णासाठी कराव्या लागणाऱ्या विविध टेस्टचा खर्च वेगळा असणार आहे. रुग्णाची ऑक्सिजन पातळी व इतर लक्षणांचे विश्लेषण डॉक्टरांनी केल्यानंतर होम आयसोलेशन करायचे की, हॉस्पिटलमध्ये ठेवायचे याचा निर्णय डॉक्टर घेतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत कोरोनाचे वाढते रुग्ण, खाटांचे आरक्षण आणि उपचारपध्दती याबाबत खासगी डॉक्टर्सची बैठक झाली. होम आयसोलेशनची सेवा यापूर्वी ११ हजार रुपयांत काही खासगी हॉस्पिटलमध्ये मिळत होती. ५ हजारांत ही सेवा १० दिवसांसाठी देण्याबाबत रविवारच्या बैठकीत एकमत झाले. गृहअलगीकरण करताना अधिकचे शुल्क घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांच्या बैठकीत देण्यात आला. सध्या शहरात १२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत.
ज्यांना कमी लक्षणे आहेत, ६० वर्षांतील वय असावे. घरात प्रसाधनगृह स्वतंत्र असावे. ५०० रुपयांत एकदा वैद्यकीय सल्ला व्हिडिओ कॉलमार्फत दिला जाईल. १० वेळा तपासणी केली जाईल. त्यासाठी खासगी रुग्णालयांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या टेस्ट करण्याची गरज असेल, त्याचे वेगळे शुल्क रुग्णाला द्यावे लागतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात मनपा ३६१० बेड करणार आहे. १८१४ बेड कार्यरत आहेत. १७९६ बेड तयार होतील. ३०० बेड मनपाकडे रिकामे आहेत. मनपाकडे सध्या २१ कोरोना सेंटर आहेत. त्यातील १२ सुरू आहेत. जिल्ह्यात ३०० व्हेंटीलेटर असून १०० वाढविण्याचा प्रयत्न आहे. घाटीला व्हेंटीलेटर देण्याचे नियोजन आहे.
खासगी हॉस्पिटलबाहेर बोर्ड लावणार
लसीकरण न करणाऱ्या डॉक्टर्सच्या हॉस्पिटलबाहेर फ्लेक्स लावून आवाहन करण्यात येईल. या रुग्णालयातील डॉक्टर्सनी कोरोना लसीकरण केलेले नाही. येथे उपचार घ्यायचे की नाही, तुम्ही ठरवा. असे आवाहन करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. टेस्ट वाढल्यामुळे रुग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा निर्णय झाला आहे.
कन्टेंनमेंट झोन वाढवावेत
संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कन्टेंनमेंट झोन वाढविण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. खासगी दवाखान्यांनी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी. उपचारासाठी आवश्यक औषधींचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.