औरंगाबाद : सातारा-देवळाईसह शहराच्या वेगवेगळ्या भागांतील एकाच कुटुंबातील चार ते पाच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल होत आहेत. त्यामुळे होम आयसोलेशनची सुविधा महापालिकेने आजपासून बंद केली आहे. बाधित रुग्णांना पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये किंवा खासगी दवाखान्यातच उपचारासाठी दाखल व्हावे लागेल, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या दररोज १० टक्क्यांनी वाढत आहे. हीच परिस्थिती पुढे राहिल्यास १ मार्चपर्यंत दररोज ३०० रुग्ण आढळून येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. डॉ. पाडळकर यांनी नमूद केले की, एकाच कुटुंबात कोरोनाचे तीन-चार रुग्ण आढळून येत आहेत. एकाच घरात इतके रुग्ण असल्यावर नियमांचे पालन होत नाही, परस्पर संपर्क देखील वाढतो. त्यामुळे होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कुणालाही होम आयसोलेशनची परवानगी दिली जाणार नाही. कोरोनाबाधितांना उपचारासाठी महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये किंवा खासगी दवाखान्यातच दाखल व्हावे लागेल.
मेल्ट्रॉन आणि पदमपुरा येथील कोविड केअर सेंटर सुरूच आहेत. शनिवारपासून किलेअर्क आणि एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये शनिवारी काही रुग्णदेखील दाखल झाले.
अजून परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही
लग्नसमारंभ, गर्दीच्या ठिकाणांमुळे रुग्णसंख्येत वाढ
होत आहे. गर्दीची ठिकाणे देखील वाढत आहेत. मुख्य बाजारपेठेशिवाय अन्य ठिकाणी देखील गर्दी दिसून येते. या दोन कारणांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे, असे डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या. परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. नागरिकांनी सार्वजनिक उपक्रमात जाणे टाळावे, अशा उपक्रमात गेलेच तर मास्कचा वापर करावा व अन्य नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. सातारा-देवळाई भागांत दोन पथकांच्या माध्यमातून स्वॅब टेस्टिंगचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले.