औरंगाबाद : जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे संचारबंदीचे तास वाढविण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी बुधवारी संयुक्त आदेश जारी केले आहेत.
शुक्रवार, १९ मार्च ते रविवार, ४ एप्रिल २०२१ पर्यंत रात्री ८ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू राहील. या काळात वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, मीडिया सेवा, दूध व्रिक्री व पुरवठा, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा (खाजगी व शासकीय), रिक्षासह इतर बांधकामे, उद्योग व कारखाने, बँक व पोस्ट सेवा नियमानुसार सुरू राहतील. या काळात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येण्यास प्रतिबंध असणार आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक बाबीवगळता नागरिकांना कुठेही गर्दी करता येणार नाही.
महापालिकेचे उपद्रव शोध पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, वाॅर्ड अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस हवालदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी, ग्राम व नगर विकास विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांना आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कोणतीही तक्रार, खटला दाखल होणार नाही.