औरंगाबाद : पैशाच्या वादातून होमगार्ड जवानाचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना किराडपुरा येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी (दि.२४) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. सय्यद शफी अहेमद सय्यद शकील (४०,रा. नागसेन कॉलनी, रोशनगेट परिसर, बक्कल नंबर २२१) असे खून झालेल्या होमगार्ड जवानाचे नाव आहे. जमील खान हुसेन खान (३६,रा. बारी कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. जमील हा बांधकाम ठेकेदार आहे.
जिन्सी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सय्यद शफी अहेमद यांच्याकडून आरोपी जमील हा त्याच्या व्यवसायासाठी उसने पैसे घेत असे, त्याने घेतलेल्या पैशांपैकी ७५ हजार रुपये जमीलकडे सुमारे पाच ते सहा महिन्यांपासून होते. हे पैसे आज देतो, उद्या देतो,असे सांगून जमील हा वेळ मारून नेत होता. सय्यद शफी यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी आरोपी जमीलकडे पैशासाठी तगादा लावला होता.
लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी चार दिवसांपासून शफी हे व्यस्त होते. शफी यांनी जमील यास फोन करून उद्या मला पैसे दे असे सांगितले होते. दरम्यान, बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जमीलने शफी यांना फोन करून किराडपुरा येथील हॉटेल औरंगाबाद येथे ये, तुला पैसे देतो,असे सांगितले. ही बाब शफी यांनी त्यांच्या भावाला सांगितली आणि शफी हे जमीलकडून पैसे आणण्यासाठी किराडपुऱ्यातील हॉटेलसमोर गेले. हॉटेलच्या अंगणातच त्यांच्यात पैशावरून वाद झाला अन् जमीलने शफी यांचा धारदार शस्त्राने गळा चिरला. हा प्रकार हॉटेलमध्ये चहा पीत बसलेल्या ग्राहकांसमोर घडला. हे पाहून ग्राहक हॉटेलातून बाहेर पडले. काहींनी गंभीर जखमी शफी यांच्या गळ्यावर कपडा टाकून त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. गळा खोलपर्यंत चिरल्याने शफी यांचा मृत्यू झाल्याचे अपघात विभागातील डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
चार दिवसांपासून होते निवडणूक बंदोबस्तावर
सय्यद शफी अहेमद हे होमगार्ड जवान होते. लोकसभा निवडणुकीसाठी ४ दिवसांपासून ते बंदोबस्तावर होते. मंगळवारी दिवसभर मतदानाचा बंदोबस्त केल्यानंतर मध्यरात्री ते घरी परतले. अत्यंत शांत आणि हसतमुख स्वभावाच्या शफी यांचा खून झाल्याचे कळताच अनेक होमगार्ड जवान आणि त्यांच्या नातेवाईकांनी एमजीएममध्ये गर्दी केली होती.सय्यद शफी यांच्या पश्चात ८ वर्षाचा मुलगा, १४ वर्षाची मुलगी, पत्नी, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. शफी यांच्या हत्येचे वृत्त कळताच नातेवाईकांनी एमजीएम रुग्णालयात धाव घेतली.
अवघ्या तासाभरात आरोपीला ठोकल्या बेड्यासय्यद शफी अहेमद यांचा गळा चिरून हत्या केल्यानंतर आरोपी जमील हा घटनास्थळावरून पसार झाला. यानंतर तो किराडपुरा येथील एका घरात लपून बसला होता. जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक उपनिरीक्षक शेख, कर्मचारी सुनील जाधव, संजय गावंडे, राठोड आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती काढून घटनेनंतर आरोपी जमील याला तासाभरात बेड्या ठोकल्या. याप्रकरणी जिन्सी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.