सोयगाव : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ३४३ रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. या सर्व रुग्णांवर आरोग्य विभागाचे कटाक्षाने लक्ष असून, आरोग्य पथकांच्या माध्यमातून समुपदेशन केले जाते, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे दिली.
गृहविलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांना घरपोच औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. आरोग्य पथके रुग्णांच्या प्रकृतीचा नियमित अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे देत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोयगाव तालुक्यात बाधितांची संख्या १०२९वर पोहोचली आहे. त्यापैकी ८३२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या प्रकृतीचाही दैनंदिन अहवाल घेण्यात येत आहे. या रुग्णांच्या प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाहणी अहवालानंतरच निर्णय
कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णाला होम आयसोलेशन व्हायचे असल्यास त्यासाठी आधी त्याच्या घराची आरोग्य विभागाकडून पाहणी होते. पाहणी अहवालावरून होम आयसोलेशनचा निर्णय दिला जातो. घरातील अन्य कुटुंबीयांचीदेखील तपासणी केली जाते. रुग्णाची प्रकृती बिघडल्यास त्वरित संपर्क करण्यासाठी नंबर्स दिलेला असतो. त्यावर संपर्क झाल्यानंतर सुविधा दिली जाते.