औरंगाबाद : पुंडलिकनगर परिसरातील चार वॉर्डांना जोडणाऱ्या मुख्य अंतर्गत रस्त्याची पूर्णत: चाळणी झाली आहे. परिसरातील रस्त्यांच्या कामांसाठी खा.चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या छायाचित्रांचे होर्डिंग्ज लावून ‘आपण यांना पाहिलेत का’ असा निषेध करीत संघटनेने मंगळवारी रस्त्यावर होमहवन करून लक्षवेधी आंदोलन केले. वॉर्ड क्र.७९, ९३, ९४, ९५ यांच्या मधोमध जाणारा पहाडे कॉर्नर ते सुधाकरराव नाईक हायस्कूलपर्यंतचा हा रस्ता उखडला आहे. तर हिंदू राष्ट्र चौक, रिलायन्स मॉल ते विजयनगर रस्त्याची देखील पूर्णपणे चाळणी झाली आहे. या परिसरातील रस्त्याकडे मनपा, लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे शिवक्रांती संघटनेने याप्रकरणी आंदोलन छेडले. महारूद्र हनुमान मंदिरापर्यंत ४५ मीटरचा रस्ता आहेत. तेथून पुढे १२ मीटरचा आहे. २०१० मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण आमदार निधीतून करण्यात आले होते. ५ वर्षे तो रस्ता टिकला. दीड वर्षापासून त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून मजबुतीकरणात वापरलेले दगड उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक त्यावरून घसरून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शाळकरी मुले, महिलांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे. विजयनगरपर्यंतच्या रस्त्याच्या निविदा निघाल्या नाहीत, तर रिलायन्स मॉलकडे जाणाऱ्या रस्त्याची वाट भुयारी गटार योजनेच्या कंत्राटदाराने लावून टाकली. याचा त्रास नागरिकांना भोगावा लागतो आहे. शिवक्रांती संघटनेने केलेल्या आंदोलनात प्रदेश संघटक रवींद्र काळे, जिल्हा संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष काळे, राजाराम मोरे, काशीनाथ जगताप, नितीन सोनवणे, जी.के.गाडेकर, वंदना काळे, लता काळे, सोनाली गायकवाड, अंजू खोडके आदी परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला.
खड्ड्यांच्या निषेधार्थ होमहवन आंदोलन
By admin | Published: August 24, 2016 12:25 AM