फुलंब्री : तालुक्यात सोमवारी सर्जा-राजाचा पोळा सण साध्या पद्धतीने साजरा झाला. सजावट केलेल्या बैलाची विधिवत पूजा करण्यात आली. पण कोरोनाच्या सावटाने वेशीमध्ये आलेल्या बैलांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.
तालुक्यात पोळा सण नेहमीप्रमाणे साजरा न होता केवळ बैलाची पूजा करून साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले होते. या आवाहनाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. कोणताही गाजावाजा न करता साध्या पद्धतीने पोळा सण गावागावात साजरा झाला. काही प्रमाणात बैल हे वेशीमध्ये आणले गेले. तर काहींनी थेट आपल्या घरी नेऊन बैलांची पूजा केली. त्यांना पुरणपोळीचे जेवण दिले. फुलंब्री येथील पोळा, पाडवा सण प्रसिद्ध आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी येथील पोळा सणाला भेट दिली होती. ही आठवण गावातील नागरिक आजही मोठ्या अभिमानाने सांगतात. मात्र, या पोळा सणावर दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट आले होते.
-----
फुलंब्री शहरात असलेल्या तीन वेशीत पोळा सणाचा कार्यक्रम होतो. तीनही वेशीत मानाच्या ढालीची मिरवणूक काढली जाते. सोमवारी देशमुख यांच्या मानाच्या ढालीची मिरवणूक काढण्यात आली. देशमुख कुटुंबातील स्वप्नील देशमुख व कल्पना स्वप्नील देशमुख यांनी ढालीची विधिवत पूजा केली.