छत्रपती संभाजीनगर : एकाखा गुरुजीला पदोन्नती अथवा पुरस्कार मिळाला, तर त्यांचा सत्कार करण्यासाठी अनेक संघटना सरसावलेल्या आपण पाहतो. पण, सेवानिवृत्तीनंतर संघटनास्तरावर कौतुक करणारी घटना विरळच. नुकतेच आदर्श शिक्षक समितीने सन २०२२-२०२३ मध्ये निवृत्त झालेल्या एक नाही, दोन नाही, तर तब्बल ४४ शिक्षकांचा सेवागौरव करून त्यांच्या कर्तृत्वास सलाम केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षक समितीचे नेते शिवाजीराव साखरे (लातूर), रामकिसन लटपटे (परभणी), शिक्षक नेते के. सी. गाडेकर, सुधाकरराव म्हस्के, संजीव बोचरे, उपशिक्षणाधिकारी व्ही. एन. कोमटवार, विस्तार अधिकारी शिवाजी भोसले आदींची उपस्थिती होती.
सन १९८६-८७ मध्ये शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांनी सुमारे तीस ते चाळीस वर्षे ग्रामीण भागातील गावे, वाडी-वस्त्यांमधील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. अशा सुमारे ४४ निवृत्त शिक्षकांच्या सेवापूर्तीनिमित्त आ. बागडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात आ. बागडे यांनी शिक्षक उत्तम शैक्षणिक कार्य करीत आहेत, या शब्दांत शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.