फुलंब्री तालुक्यात महावितरण कंपनीने कृषीपंपाचे थकीत वीजबिल भरण्यासाठी पन्नास टक्क्यांपर्यंत माफीची महाकृषी ऊर्जा अभियान योजना सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतलाही लाभ होत आहे. तालुक्यात महावितरण कंपनीच्या १८४१८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांंकडे १९५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. आतापर्यंत ४११४ शेतकऱ्यांनी १ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी भरलेली आहे. तर पूर्ण थकबाकी भरणारे शेतकरी १२५ आहेत. पूर्ण रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरणकडून बेबाकी प्रमाणपत्र व सन्मानपत्र दिले जात आहे. या पूर्णपणे रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अंतिकाबाई केशवराव खरात, सुमनबाई हिंमतराव जाधव, राधाबाई भिकन इधाटे, ताराबाई शिवहरी बोर्डे आदी २० महिला शेतकऱ्यांसह कार्यालयातील महिला कर्मचारी सतना पवार, सुनंदा साळवे आदींचा महावितरणतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता अरुण गायकवाड, सहायक अभियंता रवी मिरगने, कडूबा काळे, मयूर गुजर, शेख अब्दुल वाजीद, उज्ज्वल पवार, उल्हास भाले आदींची उपस्थिती होती.
फोटो : फुलंब्री येथील महावितरण कंपनी कार्यालयात महिला शेतकरी व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना अधिकारी.