लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरात सुखशांती, योग्य विवाह स्थळ, परीक्षेत चांगले मार्क, दागिने दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाºया एका भोंदूबाबास सदर बाजार पोलिसांनी सोमवारी मोदीखाना पसिरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पावणेचार रुपये किमतीचे १३ तोळे सोने जप्त केले आहे.शहरातील मोदीखाना परिसरात एक भोंदूबाबा अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर बाजार पोलिसांचे एक दुपारनंतर मोदीखाना परिसरात राहणारे संजय रामबाबूलाल गुप्ता यांच्या घरी पोहोचले. गुप्ता यांच्या देवघरासमोर २५ ते ३० वयाचा एक तरुण देवी अंगात आल्याचे सांगत घरात सुखशांतीसाठी काय करावे, याबाबत गुप्ता यांच्या कुटुंबातील महिलांना उपाय सांगत होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव नरेश बाबूलाल क्षीरसागर असल्याचे सांगितले. चौकशीत त्याने विविध खुलासे केले. आठ महिन्यांपूर्वी गुप्ता यांच्या घरात बैठक घेऊन देवी अंगात आल्याचे सांगत महिलांना त्यांचे दागिने दुप्पट करून देण्यासाठी एका तांब्यात ठेवण्यास सांगितले. दागिन्यांचा तांब्या जमिनीत पुरल्याचे भासविले. तसेच विविध आमिषे दाखविली. गुप्ता कुटुंबियांनी दागिन्यांचा तांब्या काढल्यानंतर त्यात दगड, गोटे व बनावट दागिने आढळून आले. अशाच प्रकारे शहरातील इंदिरा गोपाल गुप्ता, विमल गुप्ता (रा.सासणी, अलीगढ) यांची अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केली. पोलिसांनी त्याच्याकडून तेरा तोळे सोने जप्त केले.या प्रकरणी संजय गुप्ता यांच्या फिर्यादीवरून क्षीरसागरवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. आर. पाटील, अशोक जाधव, कृष्णा तंगे, सुधीर वाघमारे, शिवाजी जमदडे, फुलचंद गव्हाणे यांनी ही कारवाई केली.
भोंदूबाबाचा भंडाफोड, १३ तोळे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 1:12 AM