माजलगाव : युतीचे सरकार येऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला, तरीही केंद्रात मंत्रीपद व सहकाऱ्यांना सत्तेत वाटा न मिळोलला नाही. पुढील तीन वर्षातही मंत्रीपद मिळण्याच्या आशा धुसर असल्याची खंत रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी मंगळवारी व्यक्त केली. कन्याकुमारी ते महु अशा सबंध देशात निघालेल्या भारत भीमयात्रेचे येथे मंगळवारी आगमन झाले. यावेळी मोंढा मैदान आयोजित सभेत ते बोलत होते. युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, सीमा आठवले, धम्मानंद मुंडे, बाबुराव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. आठवले म्हणाले की, समाज एकसंघ राहण्यासाठी ‘जाती तोडो, समाज जोडो’ ही संकल्पना घेवून भारत भीमयात्रा काढण्यात आली आहे. विविध जाती धर्मातील समपातळीवर अंतरजातीय विवाह जोडून जातीभेद नष्ट करण्याची आवश्यकता आहे. जातीवाद संपणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे म्हणाले, समतेसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाज परिवर्तनाची चळवळ येत्या काळात गतिमान करण्याचा मानस आहे.स्वागताध्यक्ष अविनाश जावळे, सीमा आठवले, शीला गांगुर्डे, बाबूराव कदम, धम्मानंद मुंडे, दिलीप जोशी, मिलिंद शेळके यांचेही भाषण झाले. भारत भीम यात्रेचे स्थानिक रिपाइं कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणात अतषबाजी करीत स्वागत केले. सुंदरराव सोळंके महाविद्यालयापासून रॅली काढण्यात आली. नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
मंत्रीपदाची आशा आता धूसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2016 11:02 PM