औरंगाबाद : तुम्ही घोड्यांची शर्यत पाहिली असेल... वायुगतीने धावत शर्यत जिंकणारे घोडे पाहिले असतील... मात्र, गुरुवारी हलगीच्या तालावर तेही चक्क बाजेवर, टेबलावर चढून चारी पाय हवेत उधळत बहरदार नृत्य करणारे घोडे हर्सूलकरांना पाहण्यास मिळाले. नाशिकहून आलेले गण्या, सोन्या व पैठणचा शंभू यांची ऐटीत चाल, दोन्ही पायावर उभे राहत चौफेर दिलेली सलामी.. डान्सचा ‘हॉर्स पॉवर’ने जमलेले गावकरी जाम खूश झाले.
निमित्त होते हर्सूल येथील हरसिद्धी देवीच्या वार्षिक यात्रा महोत्सवाचे. तिसऱ्या दिवशी दुपारी ‘घोड्यांची नृत्य स्पर्धा’ ठेवण्यात आली होती.यासाठी खास तयार करण्यात आलेल्या गोलकार मैदानाच्या चोहीबाजूला आबालवृद्ध सकाळी १० वाजल्यापासून बसून होते. दुपारी साडेबारा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. इरफान पटेल यांचा काजल नावाचा घोडा मैदानात आला. चारी पाय मुडपत खाली बसून परीक्षकांसमोर नतमस्तक झाला. त्यानंतर पाठीमागील दोन पायावर उभे राहत संपूर्ण मैदानावर चालत सर्वांना सलामी दिली. नाशिक येथील घनराज घोटे यांचा ‘गण्या’ नावाचा पांढरा शुभ्र घोडा मैदानात आला आणि आपल्या रूबाबदार चालीने सर्वांच्या टाळ्या मिळविल्या. हलगीचा तालावर त्याने नृत्य करण्यास सुरुवात केली. परातीत उभे राहून नृत्य, लाकडी पाटावर उभे राहून नृत्य एवढेच नव्हे, तर बाजेवर बाज ठेवून नृत्य केले. या गण्याने बाजेवर ठेवलेल्या गादी व लोढावर रूबाबात बसून दाखविले. त्याचीही या अदावर सर्वजण फिदा झाले होते. त्यानंतर चारीही पाय हवेत उधळत नाशिक घोटी येथील ‘सोन्या’ हा घोड्याने जोरदार एन्ट्री केली. मैदानात झोपलेल्या चार तरुणांना धक्का न लावता त्यांच्या आजूबाजूला नृत्य करत त्याने आपले संतुलन दाखवून दिले.
पैठण येथील भाऊराव रावस यांचा ‘शंभू’ घोड्याने तर कमाल केली. चारी पाय हवेत उधळतच नृत्य करण्यास सुरुवात केली. हलगीवाला वाजवून थकला पण हा घोडा नाचून दमला नव्हता... मालकाच्या इशाऱ्यावर मिनिटा-मिनिटाला आपली चाल बदलत नृत्य करत सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले. हर्सूलचा ‘कल्याण’, ‘ हिरा’ या घोड्यांनीही नृत्य करत सर्वांच्या टाळ्या मिळविल्या. ही स्पर्धा दोन तास चालू होती. मुक्या जनावरांकडून नाचकाम करून घेणे हे सोपे नव्हे. त्यामुळेच आजच्या स्पर्धेत घोड्यांच्या मालकांचाही सत्कार करण्यात आला. कारण, त्यांनी घोड्यावर घेतलेली मेहनत दिसून येत होती. घोड्याचे नृत्य पाहताना दोन तास कुठे निघून गेले हे गावकऱ्यांना कळाले नाही.