गंगापूर : अवैध वाळू वाहतूकप्रकरणी तहसीलदारांनी पकडून दिलेल्या वाळूच्या दोन टिप्परवर मंडळ अधिकारी व तलाठ्याने कारवाई न करता सोडून दिले. याप्रकरणी तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी, कोणतीही माहिती नसलेल्या व महसुलाच्या ताब्यातून फरार झालेल्या टिप्पर मालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका निर्माण झाली आहे.
१२ जून रोजी सायंकाळी रांजणगाव (शे.पू.) येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर प्रभारी तहसीलदार सारिका शिंदे यांनी पकडून स्वतः स्थळ पंचनामा न करता कारवाईसाठी मंडळ अधिकारी सतीश भदाने व तलाठी राहुल वंजारी यांच्या ताब्यात दिले होते; मात्र संबंधितांनी यावर कोणतीही कारवाई न केल्याने सदरील दोन टिप्पर महसूलच्या ताब्यातून फरार झाले. याविषयी सारिका शिंदे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला होता. याप्रकरणी वंजारी व भदाणे यांनी थातूरमातूर खुलासे दिल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात तसे न होता या प्रकरणी गायब झालेल्या टिप्पर मालकांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र तहसीलदारांनी काढले आहे. यामुळे यात काहीतरी शिजतय अशी चर्चा तहसील कार्यालय परिसरात सुरु आहे.
कारवाईला १४ दिवस का लागले
वास्तविक पाहता याप्रकरणी घटनास्थळी १२ जून रोजीच कारवाई होणे अपेक्षित होते; मात्र कारवाईला १४ दिवस उशीर का झाला. हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. विशेष म्हणजे फरार झालेल्या टिप्पर गाड्यांचे कोणतेही क्रमांक प्रशासनाकडे नाहीत. त्यामुळे गुन्हा नेमका कोणावर दाखल करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. टिप्पर पकडल्यानंतर घटनास्थळीच पंचनामा करुन संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात गाड्या देणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. ही कारवाई औद्योगिक वसाहतीत केली असून परिसरात मोठ्या संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे असूनही फरार टिप्परचा शोध कसा लागत नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहत असून यात वरिष्ठच संबंधितांना पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे.