औरंगाबाद : बदनामी केली म्हणून रुग्णालयातून हाकलून दिलेल्या रुग्णास सोमवारी उपचारासाठी पुन्हा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घाटी रुग्णालयात स्डँडअभावी वडिलांसाठी हातात सलाईन धरण्याची वेळ आल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. या प्रकाराबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांकडून घाटी प्रशासनाला विचारणा करण्यात आली; परंतु याच रुग्णाला घाटीची बदनामी केल्याचे म्हणत रुग्णालयातून हाकलून देण्यात आले होते. अर्धवट उपचार झालेल्या या रुग्णाने ‘लोकमत’ कार्यालय गाठून आपली कैफीयत मांडली होती.
खुलताबाद तालुक्यातील मौजे भडजी येथील एकनाथ गवळे असे या रुग्णाचे नाव आहे. गवळे हे ५ मे रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. घाटीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना शस्त्रक्रियागृहातून वॉर्डात नेताना हातात सलाईन धरण्याची वेळ त्यांच्या मुलीवर आली. आजारी वडिलांसाठी हातातच सलाईन धरून मुलीला उभे केल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्याने घाटीतील दयनीय अवस्था समोर आली.
या प्रकाराविषयी माध्यमांमधून वृत्त प्रकाशित झाले. या घटनेनंतर १८ मे रोजी डिस्चार्ज कार्ड न देता हाकलून दिल्याने उपचार अर्धवट राहिल्याचा आरोप एकनाथ गवळे यांनी केला. अखेर आज त्यांना उपचारासाठी पुन्हा घाटी दाखल करण्यात आले.
( मुलीला सलाईन धरायला लावली? सहसंचालक लहाने यांच्याकडून घाटी प्रशासनाची कानउघडणी )