औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात मागील पाच दशकांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हजारो रुग्णांचा भार सोसत आहे. घाटी रुग्णालयातील रुग्णांचा भार कमी व्हावा, अशी ओरड मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. शासनाने चिकलठाणा येथे २०० खाटांचे भव्य दिव्य रुग्णालय उभारले. त्यानंतर नवजात शिशू आणि गरोदर महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रुग्णालयासाठी महापालिका मागील दोन वर्षांपासून जागा देण्यास तयार नाही. महापालिकेच्या असहकार वृत्तीमुळे रुग्णालय उभारण्याचा प्रश्न लालफितीत अडकला आहे.शहरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचे काम महापालिकेचे आहे. मनपा प्रशासनाने नेहमीच ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मनपाचे आरोग्य केंद्रे फक्त नावालाच सुरू आहेत. गंभीर आजारांसाठी नागरिकांना आजही घाटी रुग्णालयावरच विसंबून राहावे लागते. घाटीत दररोज ३ हजार नागरिक बाह्यरुग्णसेवेसाठी येतात. ११७७ खाटांची क्षमता असताना सुमारे १५०० पेक्षा अधिक रुग्ण दाखल करून घ्यावे लागतात. घाटी रुग्णालयावरील हा भार कमी करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी महापालिकेने मध्यवर्ती जकात नाका येथे बीओटी तत्त्वावर २०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याची घोषणा केली. नेहमीप्रमाणे ही घोषणा हवेतच विरली. एकाच छताखाली विविध आजारांच्या चाचण्या करून देण्याची घोषणा राजकीय मंडळींनी केली. ही घोषणाही राजकीय स्वरुपाचीच ठरली. रुग्णसेवेच्या बाबतीत महापालिका किती गंभीर आहे, हे अनेक घोषणांवरून दिसून येते.चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने चिकलठाणा येथे २०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. तब्बल ३८ कोटी रुपये खर्च करून टुमदार रुग्णालय उभारण्यात आले आहे. आता हे रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यास घाटीवरील ताण किंचित कमी होईल. दोन वर्षांपूर्वी काँग्रेस आघाडी सरकारने नवजात शिशू आणि गरोदर महिलांच्या प्रसूतीसाठी २०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली. रुग्णालयासाठी शहरी भागात कुठेही मनपाने ७ एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आरोग्य विभागाने केली आहे. अगोदर शासकीय दूध डेअरी येथे हे रुग्णालय करण्यावर राजकीय मंडळींनी भर दिला. या जागेवर भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून महापालिकेने ७ एकर जागा उपलब्ध करून न दिल्याने रुग्णालयाचा प्रश्न लालफितीत अडकला आहे. मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा पत्र पाठवून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी सातारा-देवळाई भागात मनपा प्रशासनाने ७ एकर जागा द्यावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.महापालिका रुग्णालये, खाजगी रुग्णांची संख्या खूप असली तरी घाटीच्या प्रसूती विभागात दररोज सुमारे ७० महिलांची प्रसूती होते. कधीकधी हा आकडा शंभरहून अधिकही होतो. प्रसूती विभागाच्या क्षमतेपेक्षा चारपट काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. घाटीत दाखल झालेल्या रुग्णाला नाही कसे म्हणावे, असा प्रश्न डॉक्टरांकडून करण्यात येतो. जागा नसतानाही रुग्णांना दाखल करून घ्यावे लागते.तीन वर्षांपूर्वी एका खाजगी कंपनीच्या फाऊंडेशनने शहरात दोन नेत्र रुग्णालय उभारण्यासाठी महापालिकेकडे रीतसर प्रस्ताव दाखल केला होता. महापालिकेने फक्त जागा उपलब्ध करून द्यावी, रुग्णालय चालविणे, त्यावरील संपूर्ण खर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात येणार होता. महापालिकेतील तत्कालीन राजकीय मंडळींनी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव धुडकावून लावून ‘आमचा काय फायदा’असा थेट प्रश्न कंपनीला केला होता. त्यामुळे कंपनीने कानाला खडा लावून प्रस्ताव मागे घेतला होता.
मनपाला रुग्णालयाची अॅलर्जी
By admin | Published: May 30, 2016 1:09 AM