लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ट्रक आणि कार अपघातात गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या एका व्यक्तीला आयएएस अधिकारी ओम प्रकाश बकोरिया यांनी उचलून स्वत:च्या वाहनातून घाटीत नेले. कारमधून अपघात विभागात नेण्यासाठी त्यांना तब्बल दहा ते बारा मिनिटे स्ट्रेचरची प्रतीक्षा करावी लागली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पाहिले आणि एका खोलीतून स्ट्रेचर आणले आणि वॉर्डात नेले. त्यानंतर उपचार सुरू झाले. बकोरिया यांच्यामुळे जखमीला तात्काळ उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.योगेश श्रीकांत पानसरे (४२, रा. देवगिरी व्हॅली) असे जखमीचे नाव आहे. प्राप्त माहिती अशी की, शनिवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास पडेगाव येथील कादरी रुग्णालयासमोर ट्रक आणि कारमध्ये जोरदार अपघात झाला. या अपघातात योगेश पानसरे यांच्या एका पायावरून वाहनाचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले.काही लोक त्यांना पाहून पुढे जात होते, तर काहींनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. नेमके त्याचवेळेस महावितरणचे प्रादेशिक संचालक ओम प्रकाश बकोरिया तेथून शहराकडे येत होते. त्यांनी हे दृश्य पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता ते मदतीला धावले. सुरक्षारक्षक आणि लोकांच्या मदतीने त्यांनी जखमीला त्यांच्या कारमध्ये घेतले व घाटीत नेले. अपघात विभागासमोर कार उभी केली आणि स्ट्रेचरसाठी ते आणि त्यांचा सुरक्षारक्षक अपघात विभागात गेले. तेथील कर्मचाºयांना त्यांनी तात्काळ स्ट्रेचर घ्या आणि जखमीला आत घ्या, असे सांगितले; मात्र तेथे स्ट्रेचरच नसल्याचे त्यांना समजले. रुग्णाला तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी ते दोन ते तीन वेळा वॉर्डात गेले आणि कारकडे आले. त्यांची ही धावपळ सामाजिक कार्यकर्ते अकिल अहेमद, किशोर वाघमारे, जुनेद शेख आणि महंमद आसेफ यांनी पाहिली. त्यांनी तेथील एका खोलीतून स्ट्रेचर आणले आणि विना हॅण्डग्लोज जखमीस वॉर्डात दाखल केले. स्ट्रेचर मिळण्यास दहा ते पंधरा मिनिटे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बकोरियांची कार रक्ताने माखली होती.
अपघातातील जखमीला बकोरिया यांनी नेले रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:19 AM