राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तत्कालीन आघाडी सरकारने मंजूर केलेले २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय युती सरकारमधील भाजप-शिवसेना लोकप्रतिनिधींच्या पळवापळवीत रखडले आहे. सातारा परिसरातील जागा रुग्णांसाठी चुकीची असल्यामुळे जिल्हाधिकाºयांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात सात एकर जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले. तर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी आपल्याच मतदारसंघात हे रुग्णालय उभारण्यासाठी आरोग्यमंत्र्यांमार्फत ताकद पणाला लावली आहे.तत्कालीन आघाडी सरकारने आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यात औरंगाबाद शहरासाठी २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यास १७ जानेवारी २०१३ रोजी मंजुरी दिली. यासाठी जून २०१३ मध्ये रुग्णालयासाठी वीज, पाणी असलेल्या ठिकाणी ७ एकर जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. परंतु यावर शिवसेना-भाजप युतीचे सरकार येईपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.दरम्यानच्या काळात शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी सातारा परिसरातील भारत बटालियनच्या पाठीमागे रुग्णालयासाठी जागेची पाहणी केली. ही जागा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात येते. मात्र, रुग्णांच्या दृष्टीने निवडलेली जागा चुकीची असल्यामुळे दुसरीकडे जागेचा शोध सुरू झाला. यात भाजपचे आमदार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बाजी मारून फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील चिकलठाणा परिसरात रुग्णालय उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या. जिल्हाधिकाºयांनी १ जून २०१७ रोजी औरंगाबादच्या तहसीलदारांना पत्र पाठवून चिकलठाणा परिसरातील गट नंबर २१८ मध्ये रुग्णालयासाठी ७ एकर जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले. याची माहिती मिळताच शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी हे रुग्णालय माझ्याच मतदारसंघात झाले पाहिजे, यासाठी सिडकोचे प्रशासक ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याच वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी १४ आॅगस्ट रोजी सिडको प्रशासकांना पत्र पाठवून जागेची मागणी केली. जिल्हाधिकारी चिकलठाण्यात जागा उपलब्ध करण्याचे आदेश देतात, तर जिल्हा शल्यचिकित्सक सिडकोला विनंती करीत आहेत. यावरून सत्ताधारी भाजप- सेनेच्या लढाईत प्रशासनालाही वेगवेगळी भूमिका घ्यावी लागत आहे. यात आरोग्यमंत्री सेनेचे असल्यामुळे त्यांचे पारडे जड ठरते की कसे हे काळच ठरवेल.
रुग्णालयासाठी खेचाखेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:51 AM