वाळूज महानगर: हॉटेल मालकांच्या नावावर परस्पररित्या विविध एजन्सीकडून मद्य खरेदी करुन सव्वा आठ लाखांची फसवणूक केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. याप्रकरणी भाडेकरु हॉटेल चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमशेद मरोलीया (रा.जालना) यांचे पंढरपूरात चॉईस या नावाचे हॉटेल असून, याची परमीट रुम व बिअरबारची नोंदणी केलेली आहे. २१ वर्षांपूर्वी हॉटेल मालक मरोलिया यांनी पुथीया विटील उर्फ सुरेश कृष्णा बाबू यास १५ हजार रुपये प्रती महिन्याप्रमाणे साडेतीन लाख रुपये अनामत रक्कम घेऊन हॉटेल भाडेतत्वावर चालविण्यास दिले होते.
मरोलिया हे आजारी राहत असल्याचे लक्षात येताच सुरेश बाबू याने त्यांच्याशी जवळीक वाढविली. २०१३ मध्ये मरोलिया यांनी भाड्यात वाढ करुन ४० हजार रुपये महिना भाडे वसूल करण्यास सुरवात केली. दरम्यान, सुरेश बाबूने हॉटेलच्या नावावर विविध एजन्सीकडून मद्य खरेदी करुन त्याचे पैसे संबधितांना दिले नाही.
या हॉटेलवर कब्जा करण्याच्या उद्देशाने विज बिल थकविणे, शासकीय कराचा भरणा न करणे आदी प्रकार सुरेश बाबूने केले. तसेच त्याने १२ लाख २० हजार रुपये अनामत रक्कम दिल्याचे सांगत मरोलियाविरुध्द न्यायालयात दावा दाखल केला होता. अशातच ११ सप्टेंबर २०१६ रोजी मरोलीया यांचे निधन झाले. याचा फायदा घेत सुरेश बाबूने हॉटेलचे भाडे देण्याचे थांबविले. विविध एजन्सीकडून हॉटेलच्या नावे मद्य खरेदी करुन त्यांची बिले अदा केलेली नाहीत.
हा प्रकार लक्षात येताच मरोलीया यांच्या पत्नी शिरीन व मुलगा अरनोज यांनी त्यांच्याकडे भाड्याचे थकीत पैसे व मद्य खरेदी केलेल्या एजन्सीधारकांचे पैसे देण्यासाठी तगादा लावला. मात्र, सुरेश बाबुने पैसे देण्याऐवजी मरोलीया यांच्या पत्नी व मुलास शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. या प्रकरणी शिरीन मरोलीया यांच्या फिर्यादीवरुन सुरेश बाबूविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.