औरंगाबाद : कोरोनासाठी घालून दिलेले नियम पाळले जात नसल्याने गुरुवारी क्रांती चौक, रेल्वेस्टेशन, महावीर चौक, गुलमंडी, पैठणगेट, रोशन गेट भागातील दुकाने, हॉटेलचालकांना प्रशासनाने १ लाख २२ हजारांचा दंड ठोठावला. ऑक्सिमीटर, थर्मलगन बंद असणे, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर किंवा अॅन्टिजन टेस्ट न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात गुरुवारपासून अंशत: लॉकडाऊन करण्यात आले असून, तपासणीच्या अनुषंगाने पहिल्याच दिवशी कारवाई सुरू झाली.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जि.प.सीईओ डॉ.मंगेश गोंदावले यांनी एकत्रित रस्त्यावर उतरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली जात आहे, याची पाहणी हॉटेल, दुकानात जाऊन केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा आल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी दुकाने बंद केल्याने त्या भागात पूर्ण लॉकडाऊन असल्याचा प्रत्यय आला.
कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने दंड आकारून सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आदेश दिले. बेशिस्तपणा केला तर दुकानाचा परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला. लॉकडाऊन नको असेल तर मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करीत क्रांती चौक येथून या मोहिमेला सुरुवात झाली.
या ठिकाणी लावला दंडक्रांती चौकातील मनुभाई मिठाई दुकानाला कर्मचाऱ्यांची चाचणी केल्याशिवाय दुकान न उघडण्याचे आदेश दिले. डिगजाम दुकानात केवळ दिखाव्यापुरते ऑक्सिमीटर व थर्मल गण होते. ते बंद असल्याने त्यांना २० हजारांचा दंड केला. व्हिनस दुकानदाराला ४ हजार, क्लासमेट, खन्ना एजन्सी, स्वाद हॉटेल, मास्टर बिगला प्रत्येकी २ हजार आणि हॉटेल विट्सला ५ हजार, हॉटेल तिरुपतीला १० हजार, हॉटेल न्यू पंजाबला ५ हजार रुपयांचा दंड लावला. १२८ विनामास्क तर इतर ३५ प्रकरणांत १ लाख २२ हजार २०० रुपयांचा दंड लावला.
कोरोना रुग्ण कमी न झाल्यास लॉकडाऊनचा इशारानियम न पाळल्यास दुकान परवाना रद्द करण्यासह कोरोना रुग्ण कमी न झाल्यास लॉकडाऊनचा इशारा पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुकानदारांना दिला. जनजागृतीसाठी शहरातील विविध भागात सात पथक तैनात करण्यात आली असून, विनामास्क असलेल्या रिक्षाचालक व नागरिकांना मोफत मास्क वाटप केले.