औरंगाबाद : पोलीस आयुक्तालय कार्यालयामार्फत ज्येष्ठ नागरिक कक्षही चालविण्यात येतो आणि त्या कक्षामार्फत दर आठवड्याला ‘काका-काकू कसे आहात, तुम्हाला काही हवे आहे का, मुलगा-सून तुम्हाला विचारतात ना,’ अशी आपुलकीने चौकशीही करण्यात येते. मात्र, शहरात २ लाखांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक असताना अशी चौकशी केवळ २५०-३०० ज्येष्ठांचीच केली जात असून, उर्वरित ज्येष्ठ मात्र या लाभांपासून वंचित राहत आहेत.
शहरात नुकताच झालेला मेहेंदळे दाम्पत्याचा मृत्यू प्रत्येकाला हादरवून टाकणारा आहे. त्यांच्याप्रमाणेच मुले बाहेरगावी असणारे अनेक ज्येष्ठ नागरिक एकेकटेच या शहरात राहतात. या सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना २०१५-१६ साली पोलीस आयुक्तलयामार्फत विशेष कार्ड देण्यात आले होते. २५० ते ३०० ज्येष्ठांना हे कार्ड देण्यात आल्यानंतर आता ही योजना बंद पडली. त्यामुळे ही यादी पुन्हा एकदा नव्याने तयार करावी आणि ही योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
चौकट :
१०९० हा क्रमांक लक्षात ठेवा
ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस आयुक्तालयामार्फत हेल्पलाइन चालविली जाते. १०९० हा हेल्पलाइनचा क्रमांक असून, ज्येष्ठांना कोणतीही अडचण आली तर त्यांनी या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. हा क्रमांक लक्षात राहिला नाही, तर ज्येष्ठांनी १०० क्रमांकावर फोन केला तरी चालेल. त्यांचा फोन येताच आम्ही त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा आणि त्या तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करू, असे पोलीस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांनी सांगितले.
चौकट :
प्रतिक्रिया
१. हजारो ज्येष्ठ नागरिक प्रतीक्षेत
अमितेशकुमार यांच्या काळात नावनोंदणी केलेल्या आम्हा ज्येष्ठ नागरिकांना पोलीस आयुक्तालयातून दर आठवड्याला नियमितपणे चौकशीचा फोन येतो. आम्हाला काय हवे-नको ते विचारले जाते. मात्र, या यादीत केवळ २५०-३०० ज्येष्ठांचाच समावेश आहे. या यादीत आम्हालाही सहभागी करा, असे म्हणणारे हजारो ज्येष्ठ नागरिक शहरात आहेत. त्यांनाही आमच्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड द्यावे, अशी मागणी आम्ही मागील २ वर्षांपासून करीत आहोत; पण त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
- अनंत मोताळे,
ज्येष्ठ नागरिक
२. ज्येष्ठ नागरिकांना माहितीच नाही
ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शहरात ज्येष्ठ नागरिक कक्ष आहे, याची ज्येष्ठ नागरिकांमध्ये अजिबातच जनजागृती नाही. केवळ २५ टक्के ज्येष्ठांना या कक्षाविषयी माहिती असेल. त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेऊन या कक्षाविषयी जनजागृती करावी, तसेच ज्येष्ठ नागरिक कार्ड अधिकाधिक ज्येष्ठांपर्यंत कसे पोहोचतील, याचे नियोजन करावे, तरच खऱ्या गरजवंत ज्येष्ठांपर्यंत पोलीस पोहाेचू शकतील.
- आर. पी. दुसे,
ज्येष्ठ नागरिक