मूल्यांकनावर शंका : बोर्डाकडून शंकानिरसन, दहावी, बारावीतील मित्र-मैत्रिणींच्या गुणांशी तुलना
---
औरंगाबाद : नववीत चांगले गुण होते. दहावीत खूप अभ्यास केला. तरी मित्र, मैत्रिणींपेक्षा तुलनेत कमी गुण मिळाले. अशा शंका, तक्रारी घेऊन पालक, विद्यार्थी विभागीय शिक्षण मंडळ गाठत आहेत. विद्यार्थी, पालकांचे शंकानिरसन बोर्डातील अधिकारी करत आहे. मूल्यांकन शाळांनी करून बोर्डाकडे दिले. त्यामुळे गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाची सुविधा नसल्याचे बोर्डाने निकालावेळी स्पष्ट केले होते. तरी, दुरुस्तीसाठी विनंत्या सुरूच आहेत.
दहावी आणि बारावीचा मूल्यांकनावर आधारित निकाल राज्य मंडळाने जाहीर केला. त्यात पुनर्मूल्यांकनाची सुविधा विद्यार्थ्यांना दिलेली नाही; परंतु काही त्रुटी अथवा आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी ते नोंदवावेत, असे राज्य मंडळाने कळवले होते. त्यानुसार विभागीय शिक्षण मंडळाकडे २० पर्यंत तक्रारी आल्या. यात विद्यार्थी मित्र-मैत्रिणींत तुलना केली जात आहे. त्यानुसार गुण कमी असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे समुपदेशन विभागीय शिक्षण मंडळ करत आहे.
----
विद्यार्थी ज्या शाळा, महाविद्यालयात शिकले. त्याच शाळांनी ठरवून दिलेल्या निकषांआधारे मूल्यांकन करून ते बोर्डाकडे ऑनलाइन भरले गेले. त्याआधारे बोर्डाने निकाल जाहीर केला. तरी तक्रारी घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना गुण दाखवून त्या गुणांमध्ये शिक्षण मंडळाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे समुपदेशन करत आहोत.
- सुगता पुन्ने, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, औरंगाबाद
---
मी त्याच्यापेक्षा हुशार, मग त्याला माझ्यापेक्षा गुण जास्त कसे ?
---
- नववीत मी त्याच्यापेक्षा हुशार होतो, दहावीत अभ्यास, ऑनलाइन क्लास, प्रात्यक्षिक केले. तरी त्याला माझ्यापेक्षा गुण जास्त कसे?
- दहावीत मला गुण चांगले होते. अकरावीतही जास्त गुण होते. तरी बारावीत कमी गुण कसे काय मिळाले?
- शाळा म्हणते बरोबर गुण दिले. बोर्डाकडून काही चूक झाली असेल. बोर्ड म्हणते आमचा काही हस्तक्षेप नाही. मी काय करू? असे प्रश्न विद्यार्थी पालक बोर्डाकडे करत आहेत.
--
ओळखीतल्या मुलांना शाळेकडून चांगले गुण दिले गेले. माझा मुलगा हुशार होता. त्याला कमी मार्क मिळाले. आता, दुरुस्तीची काही सोय नाही. काय करणार जाऊ द्या.
- संगीता बेराड, पालक
---
शाळेकडून मूल्यांकनातील तांत्रिक चुकांमुळे हुशार मित्रांना कमी गुण मिळाले. तर ज्यांनी कधीच अभ्यास केला नाही. त्यांना जास्त गुण मिळाले. पण त्यांचा पाया कच्चा राहून त्यांचा अतिआत्मविश्वास वाढेल.
- प्रतीक सुरडकर, विद्यार्थी
----
मला पहिली ते नववी प्रत्येक वर्षी माझ्या मैत्रिणीपेक्षा अधिक गुण मिळत होते. यावर्षी मात्र, मैत्रिणीपेक्षा दहावीत कमी गुण मिळाले. पण, अकरावीचा प्रवेश मिळाला त्यामुळे चिंता नाही.
- ज्ञानेश्वरी पंडित, विद्यार्थिनी
---
दहावीतील एकूण विद्यार्थी - ६५,७४०
दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थी - ६५,१५४
बारावीतील एकूण विद्यार्थी -५३,४४७
बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थी -५३,१९६