औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कामगारांना कामावरून कमी करू नका. अन्यथा कोरोना संपला, असे जाहीर करून व्यवहार सुरळीत करा, अशी मागणी ॲड. अभय टाकसाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनायोद्ध्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येत असल्याचे लोकमतने समोर आणले. त्याची दखल घेत विविध संस्था संघटनांकडून कोरोनायोद्ध्यांना कामावरून काढू नका, अशी मागणी होत आहे. कोरोना साथीच्या काळात घाटी रुग्णालय जीवनदायी ठरले. त्यामुळे रुग्णसंख्या घटल्याने ' गरज सरो वैद्य मरो' असे वागू नका. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी,कामगारांना घरी पाठवले जात आहे. हे संतापजनक व चीड आणणारे आहे, यातील एकही कामगार कर्मचारी यांना कामावरून काढून टाकू नये. अन्यथा महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा टाकसाळ यांनी निवेदनात दिला आहे. निवेदनावर विकास गायकवाड, महेंद्र मिसाळ, अभिजित बनसोडे, अजय सुरडकर, अमित भालेराव, आनंद सुरडकर, अतिश दांडगे, श्रीयोग वाघमारे, नंदा हिवराळे, नीता भालेराव, विद्या हिवराळे, नीलेश दिवेकर आदींच्या सह्या आहेत.