औरंगाबाद : रस्त्यांसाठी शासन अनुदान, भूमिगत गटार योजनेसाठी शासनाचे अनुदान, पाणीपुरवठ्यासाठी शासनाचा निधी, प्रत्येक कामांसाठी शासनाच्या पैशांवरच का अवलंबून राहावे. आणखी किती दिवस मनपा अशा पद्धतीने जगणार आहे...? असा प्रश्न पालकमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी उपस्थित केला. महापालिकेने आता तरी स्वत:चे आर्थिक स्रोत बळकट करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.पालकमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या मयूरबन कॉलनी वॉर्डात पोदार स्कूल ते पृथ्वीराजनगर येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, मनपाने वसुली वाढवावी आणि शहरात विकासकामे करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, सभापती गजानन बारवाल, विकास जैन, नगरसेवक नंदकुमार घोडेले, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, शहर अभियंता सिकंदर अली उपस्थित होते.तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या वॉर्डात मोंढानाका ते तानाजी चौक, गुरुद्वारा कमान आदी ठिकाणच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी संत एकनाथ रंगमंदिरासाठी २ कोटी रुपयांचे अनुदान डीपीडीसीमधून देण्याचे मान्य केले. बालाजीनगरचा पाणी प्रश्न किती दिवसांत सोडविणार, असा प्रश्न आयुक्तांना केला. आयुक्तांनी आठ दिवसांमध्ये प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. १०० कोटी रुपये रस्त्यांसाठी मी आणले. भाजपचे महापौर त्याचे श्रेय घेत असतील तर घेऊ द्या. शेवटी पैसा शासनाचा आहे. ते श्रेयाचे होर्र्डिंग लावत असतील तर लावू द्या, काहीच हरकत नाही.
शासनाच्या पैशांवर किती दिवस जगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 1:01 AM