छत्रपती संभाजीनगर - शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर पातळी सोडून टीका करताना पाहायला मिळत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतील एका सभेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्याला, शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता, संजय शिरसाट यांच्या टीकेचा समाचार ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांनी घेतलाय.
संजय शिरसाट यांनी टाकरे गटावर केलेल्या टिकेला विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय शिरसाट हे काहीही बरळतात. त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते असं काहीही बोलतात. मी कशाला शिरसाट यांना फोन करू, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. तर, सुषमा अंधारेंवर केलेल्या टीकेवरुन चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांना जुगाराची नाद असल्याचं, नक्कल करुन सांगितलं. तुमची किती लफडी आहेत, काढले तर खूप लफडे येतील. आता, गोव्याला हारुन आलेत हे.. असे म्हणत खैरे यांनी हातावर हात मारत जुगारीची नक्कल करुन दाखवली. तर, स्त्रीयांवर अशा प्रकारची वक्तव्य करणं चुकीचं आहे. यापूर्वी अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल अशीच खालच्या भाषेत टीका केली होती. आता, शिरसाट यांनीही तेच केलय. या नेत्यांमध्ये स्त्रियांचा अवमान करण्याची स्पर्धाच लागलीय, पण हे योग्य नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे म्हणत दानवे यांनीही शिरसाट यांच्यावर पलटवार केलाय.
काय म्हणाले होते संजय शिरसाट
ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहिती, अशी टीका करताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली. तर, अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर सडकून टीका केली होती.
मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक
स्वप्न पहा, शिरसाट यांची बडबड कोणी ऐकत नाही. आमदार संजय शिरसाट यांची बडबड आजकाल कोणीही ऐकत नाही. ते बडबड करीत असतात.त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. मी शिंदे गटात यावे,असे त्यांचे स्वप्न असेल तर ते त्यांनी पहावे. - आ. अंबादास दानवे, विधानपरिषद विरोधीपक्षनेते