छत्रपती संभाजीनगर : त्रिमुर्ती चौक ते चेतक घोड्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी मनपाने मागील आठवड्यात मार्किंगला सुरूवात केली. रस्ता काही ठिकाणी १८ तर काही ठिकाणी २४ मीटर रुंद आहे. नागरिकांनी, रस्ता नेमका किती? या मुद्यावर विरोध करीत मार्किंग थांबविले होते. बुधवारी या भागातील नागरिकांनी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या नेतृत्वाखाली मनपा प्रशासक यांची भेट घेतली. प्रशासकांनी रस्त्याचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. ७ दिवसात याचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
शिष्टमंडळाने प्रशासक जी. श्रीकांत यांना सांगितले की, या भागात व्यापाऱ्यांची छोटी दुकाने असून, २४ मीटरचा रस्ता केल्यास गोर-गरीब व्यापाऱ्यांची दुकाने जातील. व्यापारी रस्त्यावर येतील. हा रस्ता १५ मीटरचा करण्यात यावा, अशी मागणी तुपे यांनी केली. त्यावर जी. श्रीकांत यांनी शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. रस्ते मोठे करणे आवश्यक आहे. १५ मीटरचा रस्ता शक्य नाही. १८ मीटरच्या रस्त्याचा विचार करता येईल. १८ आणि २४ मीटरचा रस्ता ग्रहित धरून टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात यावे. त्यात कोणाचे किती नुकसान होईल, हे स्पष्ट होईल, त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे जी. श्रीकांत यांनी नमूद केले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर राजेंद्र मंडलिक, सोमनाथ लोळगे, नितीन संचेती, निलम चावडा, मिनी रोडगे, आनंद वर्मा, सुनील शेजूळ, मोहनदास अरडेजा, संतोष चेडे, निलेश वानखेडे, ए. के. लांडे, अजित कदम, अशिष क्षीरसागर यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.
गुंठेवारी करावीच लागेल१५ मीटरचा रस्ता केला तरी या भागातील अनेक व्यापारी, नागरिकांनी अद्यापही गुंठेवारी केलेली नाही. व्यापाऱ्यांना अगोदर गुंठेवारी करावी लागेल. त्यानंतरच १८ मीटर रस्त्याचा निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासकांनी शिष्टमंडळाला सांगितले. आजपर्यंत फुकटात भरपूर वापर केला, असा टोला जी. श्रीकांत यांनी लगावला.