औरंगाबाद: आमच्यावर किती खोके घेतली असा आरोप करता, गद्दार म्हणता. खरे गद्दार तर मातोश्रीवर आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या तिन्ही पक्षांचे संख्याबळ असताना अपक्ष शंकरराव गडाख यांचा पाठिंबा का घेतला? मंत्रिपद देण्यासाठी त्यांच्याकडून किती खोके घेतली? असा सवाल पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. ते आज औरंगाबाद येथे बोलत होते.
हिंदू गर्जना मेळावा आणि संदीपान भुमरे यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभ आज संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी सत्काराला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मागील अडीज वर्षात आमची कामे झाली नाहीत. कित्येक वेळा मागण्यांचे निवेदन उद्धव ठाकरेंच्या टेबलवर तसेच पडून राहत. कोणतीही मागणी करा ठाकरे निधीसाठी अजितदादांना फोन करत, पण त्यांनी कधीच निधी दिला नाही. मुख्यमंत्री हे आणि निधी मागायचे अजित पवारांकडे, मागील अडीज वर्ष वाया गेली अशी टीकाही भुमरे यांनी केली. तसेच खरे गद्दार मातोश्रीवर आहेत. मंत्रिपद देण्यासाठी अपक्ष शंकरराव गडाख यांच्याकडून किती खोके घेतली हे आम्हाला सवाल करणाऱ्यांनी सांगावे. बहुमत असताना अपक्ष शंकरराव गडाख यांना सोबत घेऊन एका शिवसेनेच्या आमदाराचे मंत्रिपद यांनी घालवले, असा आरोपही भुमरे यांनी केला.
आमचा उठाव झाला, ठाकरे कुटुंबाचे सर्व आजार पळाले मागील काळात कोरोना असतानाही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार अख्ख्या महाराष्ट्र फिरत होते. अजित पवार हे देखील सकाळी आठ वाजता मंत्रालयात येत. तेव्हा उद्धव ठाकरे गळ्याला बेल्ट, तोंडाला मास्क लावून घरी बसत. केवळ टीव्हीवर दिसत. मात्र, आम्ही उठाव केल्यानंतर त्यांचा बेल्ट गेला, मास्क गेले. आदित्य, तेजस, वरून घराबाहेर आले. ठाकरे कुटुंबाला असा कोणता डॉक्टर भेटला की त्यांचे सर्व आजार पळाले, असा टोलाही भुमरे यांनी केला.