औरंगाबाद : मागील दहा वर्षांत किती प्राध्यापकांनी तासिका घेतल्या; विभागात कोणकोणते उपक्रम राबविण्यात आले, विभागात संशोधन कार्य कसे चालू आहे, या सर्वांचे आॅडिट करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. येत्या ९, १० आणि ११ जुलै रोजी हे आॅडिट होणार आहे.
विद्यापीठात आणि उस्मानाबादच्या उपकेंद्रातील शैक्षणिक विभागात हे आॅडिट होणार असून, त्यासाठी बाहेरून १२ तज्ज्ञ बोलावण्यात येणार असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगासह राज्य सरकारने विद्यापीठांना शैक्षणिक आॅडिट करण्याच्या वारंवार सूचना दिल्या तरीही शैक्षणिक आॅडिट काही झाले नाही. विद्यापीठ ‘नॅक’च्या तिसऱ्या फेरीला सामोरे जात आहे. यामुळे विद्यापीठातील विभागांचे शैक्षणिक आॅडिट करावेच लागणार आहे. त्यादृष्टीने प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या नेतृत्वात नियोजन सुरू झाले आहे.
या आॅडिटसाठी विद्यापीठातील विभागांचे एकूण सहा गटांत विभाजन केले असून, त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. प्रत्येक विभागात मागील दहा वर्षांपासून झालेले कार्यक्रम, तासिका, संशोधन, पायाभूत सुविधांचा आढावा यामध्ये घेतला जाणार आहे. कोणत्या विभागात किती विद्यार्थी उपस्थित होते व किती प्राध्यापकांनी किती तासिका घेतल्या हेही यातून समोर येणार आहे.
आॅडिटसाठी असणार ६२० गुणविद्यापीठातील विभागांचे शैक्षणिक आॅडिटची चार प्रकारात विभागणी केली आहे. यात प्रशासनासाठी १२५ गुण, शैक्षणिक कार्यक्रमांसाठी १४०, संशोधनासाठी १६० आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी १९५ गुण दिले जाणार आहेत. या एकूण ६२० गुणांपैकी ७६ ते १०० गुण मिळविणाऱ्या विभागाला अतिउत्तम, ६१ ते ७५ टक्क्यांदरम्यान असणाऱ्यांना चांगला, ५१ ते ६० टक्क्यांसाठी समाधानकारक आणि ५० टक्क्यांवर असणाऱ्यांना सुधारणेची गरज, असा शेरा दिला जाणार आहे.