- संजय जाधव
पैठण : मराठवाड्यातील २ कोटी जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा कायम स्वरूपी प्रश्न निकाली काढणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने पावले उचलले आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रस्तावित प्रकल्पा अंतर्गत पहिल्या टप्प्यात जायकवाडी धरण क्षेत्रातील पैठण तालुक्यासह उजणी धरण क्षेत्रातील लातूर जिल्ह्यातील किती तालुक्याला पाणी पुरवठा करता येईल याचा अंमलबजावणी अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव यांच्या आदेशानुसार पाणीपुरवठा मंत्रालयाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता यांना दिले आहेत. दि २३ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे.
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याची चर्चा होत असतानाच राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या या निर्णयाने मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. वॉटर ग्रीड योजने अंतर्गत प्रशासकीय स्तरावर हालचाली झाल्याने पैठणसह औरंगाबाद लातूर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील टंचाई ग्रस्त गावांना दिलासा मिळणार आहे.
मराठवाड्यातील धरणांना जोडण्यासाठी १३३० किमीची पाईपलाईनमराठवाड्याच्या सुमारे २ कोटी लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी योजनेचे काम प्रस्तावित आहेत. या योजनेंतर्गत १ हजार ३३० किलोमीटरची मुख्य पाइपलाईन टाकण्यात येणार असून जायकवाडी, निम्न दूधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापूर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव या ११ धरणांना लूप पध्दतीने जोडण्यात येणार आहे. धरणे जोडल्या नंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून विविध तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलोमीटर दुय्यम पाईपलाईन प्रस्तावित आहे.पाणी टंचाईने होरपळलेल्या मराठवाड्यासाठीवॉटर ग्रीड योजना जीवनदायी ठरणार असल्याने मराठवाड्यातील कोट्यावधी जनतेचे लक्ष या योजनेचा अंमलबजावणी कडे लागले आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये तत्कालीन भाजप शिवसेनेच्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडची घोषणा केली. इस्त्रायलमधील मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायजेस या कंपनीने राज्य सरकारला अहवाल सादर केलेला आहे.
कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणार....मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी कोकणातील (पश्चिम वाहिनी) नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत नेमलेल्या अभ्यास समितीने २०१९ मध्ये सरकारला अहवाल सादर केला आहे. कोकणातील अंबिका, औरंगा, नार-पार, दमणगंगा-वैतरणा, वैतरणा, उल्हास दमणगंगा नद्यांच्या खोऱ्यातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी आनण्यात येणार आहे. दमणगंगा खोऱ्यातून दहा टीएमसी, वैतरणा खोऱ्यातून पाच टीएमसी आणि उत्तर कोकणाील नद्यांतून १०० टीएमसी पाणी असे सुमारे ११५ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणले जाऊ शकते असे अभ्यास समितीने अहवालात म्हटले आहे.
सध्या मराठवाड्यात १५० टीएमसी पाण्याची तूट....मराठवाड्यात सिंचनासाठी ३६० टीएमसी व बिगर सिंचन ६५ टीएसमी असे मिळून ४२५ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या मराठवाड्यात २७५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. मराठवाड्यात १५० टीएमसी व जायकवाडी धरणात ३० टीएमसीची तूट असल्याचे अभ्यास समितीने अहवालात म्हटले आहे. हि तूट कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणून भरण्याचा मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा उद्देश आहे.