औरंगाबाद : शहरात नेमके वृक्ष किती यासंदर्भातील गणना आजपर्यंत झालीच नव्हती. शहरातील लोकसंख्येच्या निकषानुसार वृक्ष असावेत म्हणून औरंगाबाद फर्स्ट, महापालिका, स्मार्ट सिटी, प्रयास फाउंडेशन आणि एमजीएमच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष गणना केली जात आहे. मागील सव्वा महिन्यात २६ हजार ८७७ वृक्षांची नोंद ॲपवर झाली आहे.
जागतिक स्वच्छ हवा दिनानिमित्ताने ७ सप्टेंबरला लोकसहभागातून वृक्षगणनेच्या मोहिमेची सुरुवात झाली होती. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या सहकार्याने औरंगाबाद फर्स्टने ट्री सेन्सस ॲप तयार केले. वृक्ष गणनेच्या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांना या ॲपवर नोंदणी करावयाची आहे. आतापर्यंत शहरातील सात मोठ्या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी वृक्ष गणनेत सहभाग नोंदविला आहे. संबंधित संस्था व परिसरातील झाडांची गणना केली आहे. या मोहिमेसाठी औरंगाबाद व्यापारी महासंघ, पेंट उत्पादक संघटनेने पांढरा रंग दिला आहे. ज्या झाडाची नोंद झाली त्यावर पांढऱ्या रंगाने गोल पट्टे मारले जात आहेत. सात संस्थांच्या एक ते दीड हजार विद्यार्थ्यांनी मोहिमेत सहभाग घेत २६ हजार ८७७ वृक्षांची नोंद ॲपवर केली असल्याचे ऋषिकेश डोणगावकर याने सांगितले.
४५० प्रकारच्या झाडांची नोंद शक्यशहरातील तरुण ऋषिकेश डोणगावकर याने हे ॲप तयार केले असून, त्याद्वारे जिओ टॅग करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे एखादे झाड नेमके कुठे आहे याचा शोध घेणे सोपे होईल. ज्या ठिकाणी डॅशबोर्डवर खासगी आणि शासकीय जागेवर असलेल्या झाडांची माहिती तत्काळ मिळेल. त्याचप्रमाणे त्या झाडाचे नाव, खोडाचा आकार, झाडाची स्थिती, ठिकाण, उंची या सर्वांची माहिती मिळणार आहे. ही सर्व माहिती औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सर्व्हरला जमा होईल. ४५० जातींच्या झाडांची नोंद या ॲपद्वारे होऊ शकते.