छत्रपती संभाजीनगर : जीवनशैलीतील बदल, वातावरणातील बदल, वयोमानामुळे अनेक आजार मागे लागतात. अनेक आजारांचे निदान हे पॅथॉलाॅजिस्टकडून होणाऱ्या ‘टेस्ट’नंतरच होते. एकप्रकारे या टेस्टनंतरच खऱ्या अर्थाने उपचारांना दिशा मिळते.
किती प्रकारच्या टेस्ट आहेत?साधारण पाच हजारांपेक्षा जास्त प्रकारच्या टेस्ट आहेत; परंतु यातील प्रमुख काही ‘टेस्ट’ करण्याचे प्रमाण अधिक आहे. कारण काही आजारांचे प्रमाण अधिक आहेत. त्यामुळे या टेस्ट करण्याचे प्रमाण अधिक आहे.
‘सीबीसी’ ही टेस्ट कशासाठी केली जाते?‘सीबीसी’मध्ये रक्तातील विविध पेशी आणि त्यांचे प्रमाण मोजले जाते. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेटचे प्रमाण त्यातून कळू शकते. ॲनिमिया, काही इन्फेक्शन आहे का, हे स्पष्ट होऊ शकते. शिवाय रक्ताचा कर्करोग आहे का, हेदेखील समजण्यास मदत होते.
मधुमेह, किडनी, लिव्हरचे विकार कसे कळू शकतात?‘बेसिक बायोकेमिस्ट्री’त किडनी, लिव्हर फंक्शन टेस्ट, इलेक्ट्रोलाईट, ग्लुकोज, कॅल्शियम टेस्ट आदी चाचण्या होतात. यातून संबंधित व्यक्तीला मधुमेह, किडनी, लिव्हरचे विकार आहे की नाहीत, हे कळण्यास मदत होते.
हृदयविकाराची जोखीम कशी कळू शकते?लिपिड प्रोफाइल टेस्टमध्ये कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आदींचा समावेश आहे. यातून हृदयविकाराची जोखीम कळण्यास मदत होते. जोखीम कळल्यास संबंधित व्यक्तीला उपचारांसाठी पुढील दिशा मिळू शकते.
‘युरिन रुटिन’ कशासाठी केली जाते?लघवीतील प्रोटिन, शुगर, लघवीतील इतर पेशी आणि इतर घटकांची ‘युरिन रुटिन’मध्ये तपासणी केली जाते. यातून किडनी विकार आणि मूत्रमार्गावरील संक्रमण लक्षात येण्यास मदत होते. ३५ वर्षांवरील व्यक्तींनी वर्षातून एकदा तरी सीबीसी, ‘बेसिक बायोकेमिस्ट्री’, लिपिड प्रोफाइल, ‘युरिन रुटिन’ टेस्ट केली पाहिजे.