औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन लावण्यासंदर्भात रविवारी महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. शहरात चोवीस तास लॉकडाऊन लावला तर लसीकरण मोहीम ठप्प पडेल, अशी शक्यता आरोग्य विभागाला वाटत आहे. लॉकडाऊन लावताना लसीकरणाचा निकषही प्रशासनाला डोळ्यासमोर ठेवावा लागणार आहे. मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर लसीकरण हा एक घटक महत्त्वाचा आहे. काही दिवसांपासून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लस देण्यात येत आहे. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रन्टलाइन वर्कर, १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक, ४९ ते ५९ वयोगटातील विविध आजार असलेले नागरिक यांना लस दिली जात आहे. आतापर्यंत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तब्बल ३० हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. ५ हजार ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. दररोज एक ते दीड हजार नागरिकांना लस दिली जात आहे. सोमवारपासून किंवा मंगळवारपासून शहरात लॉकडाऊन लावले तर ज्येष्ठ नागरिक आणि इतर लस घेणारे सेंटरवर कसे पोहोचतील, अशी चिंता महापालिकेला भेडसावत आहे. त्यांच्यासाठी वेगळा वेळ निश्चित करून द्यावा लागेल. त्या वेळेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मुभा द्यावी लागेल.
दोन सेंटर आणखी वाढविणार
शहरात महापालिकेच्या वतीने सफल बारा ठिकाणी लस देण्याची सोय करण्यात आली आहे. सोमवारपासून नवीन दोन केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली. डीकेएमएम महाविद्यालय, फोस्टर महाविद्यालय येथे नवीन केंद्र राहतील.
आठ खासगी रुग्णालयांमध्ये लस
सोमवारपासून शहरातील आठ खासगी रुग्णालयांमध्ये लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये धूत हॉस्पिटल, हेगडेवार हॉस्पिटल, एमजीएम, कमलनयन बजाज, सिग्मा, मेडिकोर, अल्पाइन, एमआयटी यांचा समावेश आहे.