छत्रपती संभाजीनगर : राजकारण आणि समाजकारणात अनेकदा तडजोडी कराव्या लागतात. त्या कशा करायच्या ते लोकांनी माझ्याकडून शिकाव, असा अनाहूत सल्ला केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाराजांना दिला.
आठवले हे एका खाजगी समारंभासाठी रविवारी शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना ते म्हणाले, यावेळी शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा मी प्रयत्न केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे ती जागा रिपाइंला सुटली नाही. मागच्यावेळी शिर्डी मतदारसंघातून मला हरवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि विखे पाटलांचा हात होता. त्यांनी गावागावांत प्रचार केला की, मी निवडून आलो, तर ॲट्रोसिटीच्या केसेस वाढतील. यावेळीही मला तिकीट मिळाले नाही. पण मी कुणाला पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, असे त्यांनी मिश्कीलपण सांगितले.
मला कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासनमला आता केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले आहे. पण, सरकारसमोर असलेल्या काही तांत्रिक अडचणींचाही विचार करावा लागतो. एनडीए सरकारमध्ये १-१, २-२ खासदार असलेले अनेक पक्ष आहेत. त्यांना कोणालाच कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले नाही. परंतु, आपला चेहरा हा देशपातळीवरचा आहे. बाकीचे पक्ष त्या त्या राज्यापुरते मर्यादित आहेत. त्यामुळे मला कॅबिनेट मंत्रिपद दिले तर एनडीए सरकारचाच फायदा आहे, असे आठवले म्हणाले.