छत्रपती संभाजीनगर : शहरात अनेक बँक खातेदार असे आहेत की, त्यांनी आपल्या खात्यावर मागील एक ते दोन वर्षात एकही व्यवहार केला नाही. यामुळे बँकेने त्यांचे खातेच बंद करून टाकले आहेत. अहो, अशी शेकडो खाती निष्क्रिय झाली आहेत. मात्र, आपले खाते पुन्हा सुरू करता येते याची माहितीच या खातेदारांना नसल्याचे दिसून आले. पण चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही हे बंद खाते पुन्हा सक्रिय करू शकता, पण त्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कागदपत्रे बँकेला दाखवावी लागणार आहेत.
बँक खाती निष्क्रिय कधी होतात?तुम्ही बँकेत खाते उघडल्यावर तुम्हाला काही नियमांचे पालन करावेच लागते. त्या दर महिन्याला व्यवहार होणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक खातेदार असे आहेत की, ते सहा महिने, वर्षभर त्या खात्यात व्यवहार करीत नाहीत. बँक अशा वेळीस सूचना देत असते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्षभरापेक्षा अधिक काळ तुमच्या खात्यात व्यवहार न झाल्यास खात्यास निष्क्रियतेच्या यादीमध्ये टाकले जाते.
कोरोना काळानंतर खाते बंद होण्याचे वाढले प्रमाणसेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनानंतरच्या दोन वर्षात खाते निष्क्रिय होण्याचे प्रमाण वाढले, वर्ष, दोन वर्ष त्या खात्यांमध्ये व्यवहारच झाले नव्हते. अशा खात्यांची संख्या अधिक होती. मात्र, आता खाते बंद होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
बँक खाते पुन्हा सुरू कसे कराल ?एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खाते बंद झाल्यानंतर ते सुरू करण्यासाठी काय करावे लागते, हे १०० पैकी ८५ खातेदारांना माहीतच नाही. ज्यांचे खाते बंद झाले आहे त्यांनी सरळ आपल्या बँकेच्या संबंधित शाखेत जावे. तेथील अधिकाऱ्यांना किंवा व्यवस्थापकाला भेटावे. त्यानंतर बंद खाते चालू करण्यासाठी लेखी अर्ज भरून द्यावा लागतो. तसेच बँकेत केवायसी फॉर्म मिळतो तोही भरून द्यावा लागतो. याशिवाय आपले आधारकार्ड, पॅनकार्ड व अन्य कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती द्याव्या लागतात. संपूर्ण शहनिशा करून बँक आपले खाते पुन्हा सुरू करते. आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक असणे आवश्यक आहे.