औरंगाबाद: सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी धरणांतील पाण्याची उपलब्धता कशी होणार, पाणी कसे देणार याबाबत गुरुवारी जलसंपदा विभागात महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीसाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर योजनेबाबत काही निर्णय होणे शक्य आहे.
मराठवाडा वॉटरग्रीडबाबत १९ महिन्यांपासून कोणताही महत्त्वाचा निर्णय झालेला नाही. योजनेचे तोटे आणि फायदे सांगणारे वेगवेगळे मतप्रवाह असल्यामुळे ग्रीडची योजना सध्या ठप्प आहे. २२ कोटींतून इस्त्रायलच्या कंपनीने डीपीआरचे काम पूर्ण केले आहे. शेती, पिण्यासाठी, उद्योगांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन ग्रीडमध्ये करण्यात आले आहे. या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी मंजूर केल्याचा दावा भाजप - शिवसेना युती सरकारने केला होता.
चौकट...
ही धरणे एकमेकांना जोडण्याचा आराखडा
नाशिकमधील ओव्हरफ्लो होणाऱ्या धरणांचे पाणी तसेच जायकवाडी, उजनी, येलदरी, सिद्धेश्वर, विष्णुपुरी, सीना कोळेगाव, माजलगाव, निम्न तेरणा, निम्न मनाड, इसापूर, पेनगंगा ही ११ धरणे मोठ्या जलवाहिनीने जोडून दुष्काळी भागात पाणीपुरवठा करण्याची ही ग्रीड योजना आहे.