औरंगाबाद : पंधराव्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून मनपाने प्रमुख नाल्यांवर व्हर्टिकल गार्डन उभारले आहेत. ९२ लाखांहून अधिक रक्कम या कामांवर खर्च करण्यात आली. हवा शुद्ध राहावी, म्हणून हे गार्डन उभारले. मात्र, काही नागरिक छोट्या आकाराच्या कुंड्या, त्यातील झाडे चोरून नेत असल्याचे समोर आले आहे.
काही नागरिकांची अशी मानसिकता असेल, तर शहराचा विकास कसा करावा, असा प्रश्न प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या उद्यान विभागाने चोरीला गेलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन कुंड्या, नवीन झाडे लावली. आता झाडे चोरीला जाऊ नयेत, म्हणून महागडी जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले. शहर आपले समजून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.