औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना मागील दोन वर्षांपासून औरंगाबादेत काम करीत आहे. महापालिकेवर सेनेचा भगवा फडकला पाहिजे, या दृष्टीने ‘मिशन ६०’वर कामही सुरू होते. मंगळवारी अचानक शिवसेनेत मोठा भूकंप झाला. याचे परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत दिसून येतील. सेनेचे स्थानिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपमध्ये गेल्यास त्यांचे समर्थक उमेदवारही तिकडे जातील. सेनेला उमेदवार मिळणेही कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मागील तीन दशकांमध्ये औरंगाबाद महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीने निर्विवाद वर्चस्व गाजविले. २०१९ मध्ये युती दुभंगली. एप्रिल २०२० पासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. कोरोना, सर्वोच्च न्यायालयातील याचिका इ. कारणांमुळे निवडणूक लांबत गेली. दरम्यान, शिवसेनेने पाणीप्रश्न, रस्ते, घनकचरा इ. विकास कामे मार्गी लावण्यावर भर दिला. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आराखडा तयार करणे, तो प्रसिद्ध करणे, सुनावणी ही प्रक्रिया सुरू आहे. पावसाळ्यानंतर मनपा निवडणूक होईल, असा अंदाज आहे.
मंगळवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडाचा झेंडा रोवला. त्यांच्यासोबत औरंगाबाद शहरातील पश्चिमचे आ. संजय शिरसाठ, मध्यचे प्रदीप जैस्वाल असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीचे गणित बघितल्यास जैस्वाल, शिरसाठ समर्थकांची संख्याही बरीच आहे. दोन्ही आमदार शिंदे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले तर समर्थकही त्यांच्यामागे जातील. मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात सेनेला उमेदवार शोधणे कठीण जाईल. सेनेच्या ‘मिशन ६०’ मोहिमेला ब्रेक लागू शकतो.
नगरसेवक ते आमदारप्रदीप जैस्वाल नगरसेवक पदापासून आमदार झाले. संजय शिरसाठ यांचाही इतिहास तसाच आहे. त्यामुळे दोघांनाही महापालिका निवडणुकीतील बारकावे अत्यंत चांगल्या प्रकारे माहीत आहेत. दोन्ही आमदार शिंदे यांच्यासोबत गेले तर सेनेची मोठी गोची होणार, हे निश्चित.
तनवाणी यांचा इतिहाससेनेतील माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये जाताना त्यांनी काही नगरसेवक, कर्यकर्ते सोबत नेले होते. २०१९ पूर्वी ते सेनेत परतले. मात्र, समर्थक अजूनही भाजपमध्ये आहेत.