औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरातील खासगी आणि शासकीय डॉक्टर प्रत्येक रुग्णाची सिटीस्कॅनद्वारे (एचआरसीटी) तपासणी करीत आहेत. वास्तविक पाहता या तपासणीची अजिबात गरज नाही. रुग्णांमधील लक्षणे, रक्त चाचणीचा अहवाल उपचार करण्यासाठी पुरेसे आहे. एचआरसीटी केल्याने उपचारात बदल होतो का असा संतप्त सवालही शनिवारी केंद्रीय पथकाने उपस्थित केला. गरज नसताना केलेल्या चाचण्या म्हणजे रुग्णांना निव्वळ आर्थिक भुर्दंड होय, असे मतही केंद्रीय पथकातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे एक पथक शहरात पाहणीसाठी दाखल झाले आहे. दोन सदस्यीय पथकाने पहिल्या दिवशी ग्रामीण भागात दौरा केला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी शहरातील कंटेनमेंट झोनची पाहणी केली. शनिवारी घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली. पथकात दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमधील छातीविकार तज्ज्ञ डॉ. दीपक भट्टाचार्य आणि भोपाळ येथील एम्सचे डॉ. अभिजित पाखरे यांचा समावेश आहे. यावेळी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर हजर होते.
कोरोना रुग्णांना शहरात सर्रासपणे एचआरसीटी चाचणी करायला लावली जात आहे. त्यासाठी रुग्णांना प्रत्येकी ४ हजार रुपयांचा खर्च सहन करावा लागतोय. मात्र, अशा पद्धतीने सर्रास चाचण्या करणे चुकीचे असल्याचे मत डॉ. भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. रुग्णाची लक्षणे आणि त्याचा रक्त चाचणी अहवाल हेच कोरोना रुग्णात उपचारासाठी दिशादर्शक आहे. एचआरसीटी केल्यामुळे उपचारात बदल होत नाही. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीतच तो करावा. एरव्ही एक्स रे केला तरी पुरेसे आहे. याबाबत शहरातील सर्व डॉक्टरांना ताकीद द्या, अशी सूचना पथकाने डॉ. पाडळकर यांना सांगितले.