सिल्लोड (औरंगाबाद ) : ऋत्विक कंपनीने जळगाव-औरंगाबाद रस्त्यासाठी वापरलेल्या ७५ हजार ब्रास मुरूमाची रॉयल्टी न भरल्याने सिल्लोड तहसीलदारांनी कंपनीला ३७ कोटी ६२ लाखाचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरणाऱ्या बाळापूर येथील ऋत्विक कंपनीची गौण खनिजचे उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्र सामग्री महसूल विभागाच्या पथकाने मंगळवारी सिल केली. यामुळे खळबळ उडाली आहे.
सिल्लोड ते जळगाव रस्त्याचे काम करणाऱ्या ऋत्विक कंपनीला ग्रहण लागले आहे. शासनाने रस्त्याच्या कामासाठी दिलेले ६० कोटी रुपये बँकेने परस्पर कर्ज खात्यात जमा केल्याने ही कंपनी डब घाईस आली. यामुळे हे रस्त्याचे काम रेंगाळले होते. यामुळे कर्मचाऱ्यांचा सात महिन्या पासून पगार नाही. ज्या लोकांचे बिल बाकी आहे. अशा लोकांनी कंपनीचे सामान, यंत्र सामग्री पळविल्याची बातमी लोकमतने मंगळवारी प्रसिद्ध केली होती. आज महसूल विभागाने ७५ हजार ब्रास मुरुमाची रॉयल्टी न भरल्याने कंपनीची यंत्र सामग्री, मिक्सर, जनरेटर, यंत्रागार सिल केले. ही कार्यवाही महसूल विभागाचे मंडळ अधिकारी संभाजी देशमुख, तलाठी रवी कुलकर्णी यांनी केली.