छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेचे दोन पेपर झाले आणि तिसऱ्या पेपरच्या आदल्या दिवशी वडिलांचे अकस्मात निधन झाले. हा दु:खाचा डोंगर पेलूनही शार्दूल श्रीकांत भालेराव हा विद्यार्थी वाणिज्य शाखेत ९४ टक्के घेऊन उत्तीर्ण झाला. तो डॉ. इं. भा. पाठक कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
परीक्षा सुरू झाल्यानंतर शार्दूलला सुरुवातीच्या दोन पेपरला वडिलांची खंबीर साथ मिळाली. ते त्याला परीक्षा सेंटरवर सोडवायला यायचे आणि त्याला प्रोत्साहनही द्यायचे, पण दुसरा पेपर झाला आणि त्याच रात्री त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झोपेतच निधन झाले.
ऐन परीक्षेच्या काळात वडिलांचे छत्र हरपले, पण तरी त्याने नेटाने परीक्षा दिली. वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी अकाउंटचा पेपर होता. या विषयात शार्दूल १०० गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. निकालाच्या दिवशी वडिलांची खूप आठवण येत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. भविष्यात त्याला सीएस होऊन करिअर करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.