छत्रपती संभाजीनगर: बारावी बोर्डाचा आज ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. यात शहरातील तनिषा बोरामणीकर हिने वाणिज्य शाखेत १०० टक्के गुण मिळवत जबरदस्त कामगिरी केली आहे. तनिषा ही नामवंत बुद्धिबळपटू असून स्पोर्टच्या अतिरिक्त गुणांचा देखील तिच्या यशात समावेश आहे. वाणिज्य शाखेतून राज्यात सर्वप्रथम आल्याने तनिषाचे कौतुक होत आहे.
तनिषा रेणुका सागर बोरामणीकर ही बुध्दिबळ पटू आहे. तिला दहावीत ९८ टक्के गुण होते. त्यानंतर देवगिरी महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत तिने प्रवेश घेतला. बारावीच्या अभ्यासासोबतच तनिषाचा देशभर बुध्दीबळ स्पर्धांत सहभाग होता. बारावीत देखील ९५ टक्केच्या पुढे गुण मिळतील अशी आशा तिने बाळगली होती. आज निकाल लागल्यानंतर वाणिज्य शाखेत ६०० पैकी ६०० गुण मिळवत तनिषाने इतिहास रचला. विशेष म्हणजे, तिन्ही शाखेत मिळून १०० टक्के गुण मिळवणारी तनिषा एकमेव ठरली आहे. तनिषा नामवंत बुध्दिबळ खेळाडू असून तिने देश पातळीवरील बुध्दिबळाच्या अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. यामुळे स्पोर्ट्सच्या अतिरिक्त गुणांचा तिला लाभ झाला.
आधी 'सीए' नंतर 'यूपीएससी'तनिषाची आई रेणुका या सीए असून वडील सागर आर्किटेक्ट आहेत. या यशात देवगिरी काॅलेजच्या प्राध्यापकांचे आणि आई-वडीलांचे मार्गदर्शन लाभल्याचे तनिषाने सांगितले. आता 'सीए' होण्याचे ध्येय असून असून त्यानंतर 'यूपीएससी' देखील करणार असल्याची तनिषाने सांगितले.
दोन महिन्यात खूप मेहनत घेतली शेवटच्या दोन महिन्यात मी खूप मेहनत घेतली. मागील प्रश्न पत्रिकांचा सराव केल्याने नक्कीच खूप फायदा झाला. याशिवाय बुद्धिबळाच्या खेळाची खूप मदत झाली. माझे आकलन वाढले आहे. स्पोर्टचे १८ गुण देखील मिळाले आहे. यामुळे पैकीची पैकी गुण मिळाले. - तनिषा बोरामणिकर