औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याचा निकाल ९०.७२ टक्के एवढा लागला आहे. तर दुसऱ्या स्थानी बीड जिल्हा राहिला असून, ८८.८३ टक्के निकाल लागला आहे. विभागात उत्तीर्णतेत यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.१३ टक्के असून, मुलाची ८५.६६ टक्के एवढी आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८९ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे.
बारावी परीक्षेचा निकालाची अनेक विद्यार्थी अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. त्यात सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेली बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना महामारी मुळे यावर्षी निकाल लावण्यासाठी विलंब झाला आहे.
औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के लागला असून विभागातील ४०६ परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. सदरील परीक्षेला विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली असे एकूण विभागातून १ लाख ६४ हजार ७३०विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंद केली होती. त्यात १लाख ६३ हजार ७३८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख ४४ हजार ३७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ८७.७६ टक्के लागला. तर जालना जिल्ह्यातुन २९ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी २९ हजार ५४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर त्यापैकी २६ हजार ८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर जालना जिल्ह्याचा निकाल ९०.७२ टक्के लागला.
तसेच बीड जिल्ह्यातील ३९ हजार १५६ विद्यार्थ्यांपैकी ३८ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर त्यापैकी ३४ हजार ५४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर बीड जिल्ह्याचा निकाल ८८.८३ टक्के लागला. तसेच परभणी जिल्ह्यातील एकूण २३ हजार १३४ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ८४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ३४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परभणी जिल्ह्याचा निकाल ८४.६६% लागला. याशिवाय हिंगोली जिल्ह्यातून १२ हजार ४०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार २८० विद्यार्थी परीक्षेला बसले. तर त्यात १० हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर एकूण हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८८.५४ % एवढा लागला लागला.
मुलींची यशाची परंपरा कायमऔरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड असे एकूण विभागात बारावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. विभागातून ९२.१३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर मुलांचे प्रमाण हे ८५.६६ टक्के लागला आहे. त्यामुळे यंदा मुलींचीच बाजी मारली आहे.