औरंगाबाद : समृद्धी महामार्गावर लासूर स्टेशन येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतिपथावर असून गेल्या दोन दिवसांत त्या ठिकाणी तीन तासांचा रेल्वेब्लॉक घेऊन महाकाय क्रेनच्या साहाय्याने १३० मेट्रिक टन वजनाचे चार मोठे गर्डर बसविण्यात आले आहेत.
माळीवाडापासून पुढे नाशिक जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत (गंगापूर, वैजापूर तालुक्यात) ‘एल अँड टी’ ही कंत्राटदार संस्था समृद्धी महामार्गाचे काम करत आहे. लॉकडाऊनमुळे अलीकडे दीड महिन्यांपासून समृद्धी महामार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे. मात्र, याही काळात स्वस्थ न बसता ‘एल अँड टी’ या कंत्राटदार संस्थेने लासूर स्टेशनजवळ उभारण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावर मोठमोठे गर्डर बसविण्यासाठी ५०० व ७५० मेट्रिक टन वजन उचलण्याची क्षमता असलेले दोन क्रेन भाडेतत्त्वावर मागवले असून शुक्रवार व शनिवारी सलग दोन दिवस रेल्वे उड्डाणपुलावर ४ मोठे गर्डर बसविण्यात आले आहेत. एका गर्डरचे वजन हे १३० मेट्रिक टन असून ४५ मिटर लांबीचा आहे. येथील रेल्वे उड्डाणपुलावर असे एकूण ८ महाकाय गर्डर बसविण्यात येणार आहेत.
तीन तासांचा रेल्वे ब्लॉक घेण्यात आला महाकाय गर्डर उचलून ते पुलावर बसविणे हे जोखमीचे काम आहे. त्यासाठी लागणारे मोठे क्रेन साधारणपणे मुंबई, दिल्ली, हैदराबाद अशा शहरांमध्येच मिळतात. रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी तांत्रिक मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे या कंत्राटदार संस्थेने क्रेनसोबत अशा कुशल मनुष्यबळही बाहेरून आणले आहे. तथापि, क्रेनच्या उपलब्धततेनुसार गर्डर बसविण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. शुक्रवार व शनिवारी या दोन दिवशी अतिशय कुशलतेने ४ गर्डर बसविण्यात आले. त्यासाठी तीन तासांचा रेल्वे ब्लॉक घेण्यात आला होता. त्यावेळी तेथे ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके, ‘एल अँड टी’चे प्रकल्प अधिकारी आर. श्रीनिवासन तसेच दक्षिण- मध्य रेल्वेचे नांदेड व सिकंदराबाद येथील अधिकारी उपस्थित होते.